मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात शाळा व महाविद्यालये सुरु करता येणार नसल्याने नवं शैक्षणिक वर्षाची सुरुवात डिजिटली, ऑनलाईन पद्धतीने सुरु करणार असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. शाळांनी सुरु केलेल्या ऑनलाईन वर्गाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर आणि सुरक्षिततेवर होऊ नये, यासाठी काही गाईडलाईन्स शिक्षण विभागाकडून तयार करण्यात आल्या आहेत. मात्र, अद्याप या सूचनांचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला असून त्यांची परवानगी मिळाल्यानंतर हे निर्देश शाळा व इतर शैक्षणिक संस्थांना जारी करण्यात येणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.


शिक्षण विभागाकडून तयार करण्यात येणाऱ्या सूचनांप्रमाणे पूर्व प्राथमिक, पहिली व दुसरीच्या इयत्तांसाठी ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा वापर करण्यात येऊ नये, असं सांगण्यात आले आहे. तिसरी ते पाचवीच्या इयत्तेसाठी रोज एक तास ऑनलाईन वर्ग शाळांना घेता येणार आहेत. सहावी ते आठवीसाठी रोज दोन तास तर नववी ते बारावीसाठीच्या विद्यार्थ्यांना रोज किमान तीन तास ऑनलाईन वर्ग घेतले जाऊ शकणार आहे. या डिजिटल लर्निंगच्या प्रक्रियेमध्ये आवश्यकतेनुसार ब्रेक देण्यात यावा आणि सलग शिकवण्या घेण्यात येऊ नये, असे यामध्ये सुचवण्यात आले आहे.


सतत ऑनलाईन शिक्षणाचे वर्ग घेतल्याने त्याचा दुषपरिणाम विद्यार्थ्यांवर होत, असल्याच्या विविध भागातून अनेक पालकांच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुढील काही काळात शैक्षणिक संस्थांकडून ऑनलाईन वर्ग घेताना त्यासाठी शाळांना मार्गदर्शन तत्वे ठरवून देण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून देण्यात आली आहे. कुठल्या वर्गासाठी किती तास ऑनलाईन शिक्षण संस्थेकडून/शाळेकडून घेण्यात यावे यासंदर्भातील प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला असून परवानगी मिळाल्यानंतर यासंदर्भातील सूचना दिल्या जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

'गेल्या काही दिवसांत शाळा बंद शिक्षण सुरू हा उपक्रम अनेक शाळांमध्ये सुरू झाल्यानंतर आता ऑनलाईन शिक्षणाचे प्रस्थ वाढले आहे. मात्र हे सारे करत असताना टप्प्याटप्प्याने सुरुवात करायला हवी. मुलांच्या वयाप्रमाणे त्यांना किती वेळ ऑनलाईन बसवले गेले पाहिजे? त्यासाठी काय मानद प्रणाली हवी यासंदर्भात गाव, जिल्हा पातळीवरून आणि तज्ज्ञांकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत. याच सूचनांच्या आधारावर शिक्षण विभागाकडून SOP तयार केल्या जात आहेत. शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होणार नाही, याची काळजी पालक आणि शिक्षणमंत्री म्हणून घेणे माझी जबाबदारी आहे', अशी प्रतिक्रिया शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. यासंदर्भात केंद्रप्रमुख, शाळांचे मुख्याध्यापक, पालक, लोकप्रतिनिधी, मानसोपचारतज्ज्ञ, समाजसेवक या सगळ्यांशी चर्चा करून ऑनलाईन लेक्चर्स किती वेळ घ्यावेत? मध्ये किती ब्रेक द्यावा? कोणत्या पद्धतीने घ्यावेत यासाठीच्या सूचना तयार करण्यात आल्याची माहिती ही त्यांनी दिली.


Final Year Exam | अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्या, पुण्यातील शिक्षण संस्थांची मागणी