मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने एक लाखांचा टप्पा पार केला आहे. आज एकूण 3493 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यासह राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 1 हजार 141 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाबमध्ये आज एकूण 1718 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आजपर्यंत एकूण 47 हजार 796 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज राज्यात एकूण 127 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर सध्या 49 हजार 616 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
आज झालेल्या 127 मृत्यूंपैकी सर्वाधिक रुग्ण मुंबईतील आहेत. मुंबईत आज 90, ठाण्यात 11, पुण्यात 12, कल्याण-डोंबिवलीत 3, वसई-विरार, मीरा-भाईंदर, धुळे आणि अमरावतीत प्रत्येकी एक, नाशिक आणि औरंगाबादमध्ये प्रत्येकी दोन, सांगलीत 3 रुग्ण दगावले आहेत. आज झालेल्या मृत्यूंपैकी 92 पुरुष आणि 35 महिलांचा समावेश आहे. आज नोंद झालेल्या मृतांपैकी 67 रुग्ण 60 वर्षांवरील, 52 रुग्ण हे 40 ते 59 वयोगटातील आणि 8 रुग्ण 40 वर्षाखालील आहेत. तर 89 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोगासह इतर आजार होते, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
कोरोनाबाधित रुग्णांचा रिकव्हरी रेट 47.3 टक्के
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 1 हजार 141 वर पोहोचली तरी आतापर्यंत एकूण 47 हजार 796 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याची प्रमाण म्हणजे रिकव्हरी रेट 47.3 टक्के एवढा आहे. तर राज्यातील मृत्यूदर 3.7 इतका आहे.
राज्यात सध्या 53 शासकीय आणि 42 खाजगी अशा एकूण 95 प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 6 लाख 24 हजार 977 नमुन्यांपैकी 1 लाख 1 हजार 141 नमुने पॉझिटिव्ह (16.18 टक्के ) आले आहेत. राज्यात 5 लाख 79 हजार 569 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात 1553 संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये 75 हजार 67 खाटा उपलब्ध असून सध्या 28 हजार 200 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
Rajesh Tope PC | धनंजय मुंडे यांची प्रकृती चांगली, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती