बीड : भगवान गडावर होणार्‍या दसरा मेळाव्यावरुन अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. गडावर दसरा मेळावा घेण्यास विरोध करणार्‍या नामदेव शास्त्रींना आव्हान देत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी दसरा मेळाव्याचं डेस्टिनेशन सावरगाव निवडलं. भगवानगडापासून 50 किलोमीटर अंतरावर असणारं संत भगवान बाबांचं जन्मगाव सावरगाव रातोरात प्रकाश झोतात आलं. पण या सर्व प्रवासात गेल्या तीन वर्षांमध्ये अनेक घडामोडी घडल्या. भगवान गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याची परंपरा खंडित झाली आणि पंकजा मुंडेंनी एका नव्या अध्यायाला सुरुवात केली.


गोपीनाथ गडाची निर्मिती आणि वादाची पहिली ठिणगी

पंकजा मुंडेंनी 27 नोवेंबर 2015 ला पहिल्यांदा गोपीनाथ गडाविषयीची माहिती दिली आणि 12 डिसेंबरला होणाऱ्या गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीला गोपीनाथ गडावर येण्याचं आवाहन केलं. यापूर्वी महाराष्ट्राच्या इतिहासात फक्त एकाच गडाची चर्चा व्हायची ती म्हणजे भगवान गडाची. आता यात एका गडाचा समावेश झाला होता. म्हणूनच 27 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर दरम्यान नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्या तीन वेळा बैठका झाल्या.

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती समारोहाची तयारी सुरु झाली. परळीच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात मुंडेंचं समाधीस्थळ आहे तेच आता गोपीनाथ गड म्हणून ओळखलं जाणार होतं. यासाठी भाजपाध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही हजेरी लावली. खरं तर याच दिग्गजांच्या समोर दोन गडातील वादाची पहिली ठिणगी पडली. यापुढे भगवान गडावरुन राजकीय भाषण होणार नाही, असं नामदेव शास्त्रींनी जाहीर केलं.



आता यापुढे भगवान गड मोकळा श्वास घेईल, या नामदेव शास्त्रींच्या विधानावरून भाविक बुचकळ्यात पडले. मात्र महंतांनी भगवान गड भक्तीचा, तर गोपीनाथ गड शक्तीचा गड असेल असं म्हणत याच दिवशी पंकजा मुंडेंना स्पष्ट संकेत दिले होते. गोपीनाथ गडाच्या निर्मितीला शास्त्रींचा विरोध होता असे सूर उमटत होते. त्या दिवसापासूनच नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यात दरी निर्माण झाली जी अद्याप मिटलेली नाही.

डिसेंबरला सुरु झालेल्या या वादात पाच महिने उलटले होते. मार्च महिन्यात कोठरबनच्या भगवान बाबांच्या मंदिरात फिरता नारळी सप्ताह होता. या सप्ताहाचं निमंत्रण पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंना देण्यात आलं होतं. पण सप्ताहाच्या व्यासपीठावर कोणत्याही राजकीय व्यक्तीचं भाषण होणार नाही अशी ताठर भूमिका शास्त्रींनी घेतली. 24 मार्चला एकाच दिवशी दोघे बहिण-भाऊ म्हणजे धनंजय आणि पंकजांनी एकाच दिवशी हजेरी लावली. मात्र या दोघांचीही भाषणे सप्ताहाच्या व्यासपीठावर झाली नाहीत. त्यासाठी वेगळं स्टेज उभारण्यात आलं. आता पंकजा आणि शास्त्री यांच्यातील वादाचं केंद्र भगवान गडाकडे वळलं होतं. दसरा जवळ येत होता तसा मेळाव्यावरून कार्यकर्ते आक्रमक होत होते.

भगवान गडावरील दसरा मेळाव्याची परंपरा

1965 ला भगवान बाबांनी गडावर शस्त्रपूजन करून गडाच्या आजूबाजूच्या 25 गावातील भक्तांनी एकत्र येऊन गडावर दसऱ्याच्या दिवशी उत्सव सुरु केला. पुढे हीच परंपरा महंत भीमसेन महाराजांनी 38 वर्षे चालवली.

1993 ला गोपीनाथ मुंडेंनी पहिला मोठा सामाजिक कार्यक्रम घेतला. 2003 साली भीमसेन महाराजांचं निधन झाल्यानंतर समाजाच्या वतीने गोपीनाथ मुंडेंनी नामदेव शास्त्रींची गडाचे महंत म्हणून घोषणा केली.

2014 पर्यंत गडावर दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून लाखो लोक येत होते. गोपीनाथ मुंडेंच्या पुढाकाराने राज्यातील दिग्गज या कार्यक्रमाला हजेरी लावत होते.

भगवान गडावर एक स्टेज होतं, ज्या स्टेजवरून गोपीनाथ मुंडे भाषण करायचे. ते स्टेज मुंडेंच्या निधनानंतर तोडण्यात आलं. गोपीनाथ मुंडेंनंतर इतर कोणालाही या ठिकाणाहून भाषण करण्यास मज्जाव करण्यात आला होता.

दसरा मेळाव्याच्या नव्या अध्यायाला सुरुवात

यानंतर मात्र पंकजा आणि महंतांमधील निर्माण झालेली दरी वाढत गेली. यातच धनंजय मुंडेंनी या वादात उडी घेऊन नामदेव शास्त्रींना समर्थन दिलं. आता चर्चेच्या सगळ्या फेऱ्या थांबल्या होत्या आणि दसरा मेळावा जवळ येत होता तसा दसरा मेळाव्या संदर्भात जागेवरून वाद निर्माण झाला होता. अखेर दसरा उजाडला आणि लाखो लोक या भगवान गडाच्या पायथ्याशी जमू लागले. पंकजा मुंडे आपल्या काही समर्थकांसोबत भगवान गडावर पोहोचल्या.

गेल्या वर्षी दसर्‍याच्या एक दिवस आधी सावरगावमध्ये लोकांची बैठक झाली आणि सावरगावच्या ग्रामस्थांनी पंकजा मुंडेंना भगवान बाबांच्या जन्मगावी म्हणजे सावरगावात दसरा मेळावा घेण्याचं निमंत्रण दिलं. पंकजा मुंडेंनी ते स्वीकारलं आणि दसर्‍याच्या एक दिवस आधी मेळावा सावरगावात होणार अशी घोषणा झाली.



आता भगवान बाबांचे भक्त दसर्‍याला भगवान गडापासून 50 किलोमीटर दूर गेले होते. ज्या दसर्‍याला भगवान गडावर लाखोंची गर्दी होत होती तिथे मात्र शुकशुकाट जाणवत होता. गोपीनाथ गडाची उभारणी झाल्यानंतर आता भगवान गड मोकळा श्वास घेत आहे, असं म्हणणार्‍या नामदेव शास्त्रींच्या भूमिकेमुळे एका रात्रीत लाखोंची गर्दी निवळली.



तिकडे प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या स्टुडिओमध्ये भगवान बाबांची 25 फुटाची मूर्ती तयार झाली आहे. दसर्‍याच्या दिवशी भगवान बाबांच्या स्मारकाचं लोकार्पण होणार आहे. गोपीनाथ मुंडेंनी भगवान बाबांची कर्मभूमी असलेल्या भगवान गडावर सुरु केलेली दसरा मेळाव्याची परंपरा आता भगवान बाबांचं जन्मगाव असलेल्या सावरगावात त्यांच्या लेकीने सुरु केली आहे.