नवी मुंबई : गेल्या काही दिवसापासून राज्यात दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण झाल्याने याचा मोठा फटका कांदा पिकाला बसला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये कांद्याच्या दरात तेजी बघायला मिळत आहे. कांद्याचे दर प्रतिक्विंटल दोन हजार रुपयांवर पोहोचले आहेत.
काही दिवसांपूर्वी याच कांद्याला 500 ते 800 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत होता. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये होणारी 90 ते 110 गाड्यांची होणारी आवक 40 ते 60 गाड्यांवर आली आहे. परिणामी मुंबई, ठाण्याच्या किरकोळ बाजारपेठांमध्येही कांद्याच्या दरानं 30 रुपयांवर उसळी घेतली आहे.
एकीकडे भाव वाढत असताना दूसरीकड़े शेतकऱ्यांनी चाळीत साठवलेला कांदा संपत आला आहे. त्यामुळे कांद्याचे दर येत्या काही दिवसांत आणखी भडकण्याची शक्यता आहे.
सध्या नवी मुंबई एपीएमसी मार्केटला कांदा 17 ते 22 रूपये किलोने विकला जात आहे. तर किरकोळ मार्केटला कांदा 30 ते 35 रूपये किलो दराने विकला जात आहे. गेल्या आठवड्यात एपीएमसी मार्केटमध्ये हाच कांदा 10 ते 15 रुपये दराने विकला जात होता. एपीएमसीमध्ये नेहमी 90 ते 110 गाड्या कांद्यांची आवक होते. मात्र उत्पादनावर परिणाम झाल्याने हीच आवक आता 40 ते 60 गाड्यांवर आली आहे.
आज नाशिक जिल्ह्यातील सटाणा आणि नामपूर बाजार समितीत कांद्याला सर्वाधिक 2350 रूपये क्विंटलचा दर मिळाला आहे.