सांगली : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी भाजप सरकारविरोधात आज धनगर समाजाने रणशिंग फुंकलं आहे. सरकारला दोन महिन्यांचा अल्टिमेटम देत राज्यातील भाजपाच्या आमदार आणि खासदारांच्या मतदारसंघात सरकार विरोधात जागृती सभा आयोजित करण्याचा निर्धार दसरा मेळाव्यात करण्यात आला. तसेच मुंबईतील लढ्याचाही चंग बांधण्यात आला आहे. पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांच्या उपस्थितीत सांगलीच्या आरेवाडी येथे हा दसरा मेळावा पार पडला.
धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी या मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या मेळाव्याला राज्यातील कानाकोपऱ्यातून धनगर बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. बिरोबाचं दर्शन घेऊन हार्दिक पटेल यांच्या अध्यक्षतेखाली हा भव्य मेळावा सुरू झाला. यावेळी धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका करत गेल्या चार वर्षांपासून भाजप सरकार धनगर समाजाला फसवण्याचे उद्योग करत असल्याचा आरोप केला.
या सरकारने धनगर समाजाला खोटी आश्वासने देण्याचे बंद करून दोन महिन्यात धनगर समाजाला आरक्षण द्यावे अन्यथा भाजपाच्या विरोधात धनगर समाज जाईल, असा इशारा देत आरक्षण नाही मिळालं तर भाजपा विरोधात मतदान करण्याचं आवाहन यावेळी पडळकर यांनी या मेळाव्यात धनगर समाजाला केलं.
हार्दिक पटेल यांनीही भाजपवर टीकास्त्र सोडलं. देशात आज सर्वच समाज आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर आले आहेत. मात्र सरकारकडून या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहे. सर्व समाज आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी आरक्षणासाठी लढा देत आहे. देशाचा आणि राज्याचा भविष्य आजची तरुण पिढी असून तरुणांनी लढायला शिकलं पाहिजे, असं आवाहन करत धनगर आरक्षणाच्या मागणीला हार्दिक पटेल यांनी पाठिंबा दिला.
माझ्या येण्याने धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. पण दिल्लीत त्याचा आवाज जरूर पोहोचेल, असा टोला हार्दिक पटेल यांनी लगावला. त्याचबरोबर धनगर समाजाने एकजूट होत अस्तित्वाचा आणि आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी लढा दिला पाहिजे, असं आवाहन करत धनगर समाजाने या मागणीसाठी आता मुंबईमध्ये एकजूट होऊन आरक्षणाची मागणी केली पाहिजे, असं स्पष्ट करत धनगर समाजाला ‘मुंबई चलो’चा नारा दिला आहे.
या मेळाव्यात आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातल्या 91 भाजप आमदार त्याचबरोबर खासदार यांच्या मतदारसंघांमध्ये या आरक्षणाबाबत जागृती आणि सरकारविरोधात सभा घेण्याचा निर्धार ही करण्यात आला आहे. पुढील टप्पा हा मुंबईचा राहील आणि त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड येथील चवदार तळेपासून मुंबई असा लाँग मार्च काढून सर्टिफिकेट मिळेपर्यंत मुंबईमध्ये ठिय्या मारण्याचा निर्धार यावेळी समस्त धनगर समाजाने केला आहे.
सांगलीत हार्दिक पटेलच्या उपस्थितीत धनगर समाजाचा आरक्षणासाठी एल्गार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Oct 2018 08:31 PM (IST)
सांगलीतील आरेवाडीत धनगर समाजाच्या आरक्षणासाठी दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांचीही या मेळाव्याला उपस्थिती होती. धनगर समाजाने आरक्षणासाठी सरकारविरोधात रणशिंग फुंकलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -