Grampanchayat Election: राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचा (Gram Panchayat Election)धुरळा सुरु आहे. राज्यातील 7 हजार 682 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा रणसंग्राम सुरु असून आज प्रचाराच्या तोफा थंडावत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 18 डिसेंबरला मतदान होणार आहे तर 20 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये अनेक किस्से, घडामोडी समोर येत आहेत.
Sangli Gram Panchayat Election : सांगली जिल्ह्यात ग्रामपंचायतमध्ये निवडून येण्यासाठी अंधश्रद्धेला खतपाणी
सांगली जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुका पार पडत आहेत. या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी कंबर कसली आहे. त्यातच विरोधकांवर भानामती करण्याचा प्रकारही घडत आहे. जिल्ह्यातील खानापूर आणि वाळवा तालुक्यात हे प्रकार आढळून आले आहेत. उमेदवार निवडून येण्यासाठी आता जादुटोणा-भानामतीचा आधार घेवू लागले आहेत. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वारणाकाठी असलेल्या कनेगावात ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून येण्यासाठी आता अंधश्रद्धेचा आधार घेतला जात आहे. कोणीतरी दुरडीत केळी, कापड पीस, बाहुल्या, लिंबू, हळदी-कुंकू टाकून हे साहित्य कणेगावच्या चौका चौकात मंगळवारी, बुधवारी मध्यरात्री ठेवले होते. वाळवा तालुक्यातील कनेगाव येथील मारूती चौक, हायस्कूल चौक, भरतवाडी रोड, नवीन गावठाण वसाहत अशा प्रत्येक ठिकाणी अशा भानमतीच्या दुरड्या लोकांचे लक्ष वेधत आहेत. तर खानापूर तालुक्यातील जाधवनगर येथे ही भानामतीचा प्रकार समोर आला आहे. प्रचाराच्या बॅनर समोर नारळ, हळदी कुंकू, लिंबू आढळून आले आहे. या घटनेने परिसरात विविध चर्चा रंगू लागली आहे.
Sindhudurga Gram Panchayat Election : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चराठे गावातील विहीर बोलू लागली
तुम्ही केव्हा विहीर बोलल्याचं ऐकलंत का? ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील विहीर बोलू लागली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शहराच्या लागतं असलेल्या चराठे गावातील विहीर बोलू लागली आहे. एका उमेदवारानं प्रचाराचा भन्नाट फंडा वापरला आहे. आपलं मनोगत पत्रकाच्या माध्यमातून मांडलं आहे. मुख्य म्हणजे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर हे गाव आहे. गेली अनेक वर्षे या गावात पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. गावात सार्वजनिक विहिरी असून देखील त्या विहिरीतील पाणी गावकऱ्यांना मिळत नसल्याने गावातील युवा पिढीने मी विहीर बोलतेय, असं विहिरीचं मनोगत समोर आलं आहे.
Yavatmal Gram Panchayat Election : वणी तालुक्यातील शिंदोला गावातील ग्रामस्थांचा ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार
यवतमाळच्या वणी तालुक्यातील शिंदोला गावातील ग्रामस्थ शेतजमिनी अनेक पिढ्यांपासून कसत आहेत. मात्र, तरीदेखील त्या त्यांच्या नावावर जमिनी केलेल्या नाहीत. याबाबत प्रशासनाला वेळीवेळी विनंती करून दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी 18 डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. स्थानिक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसह आगामी सर्वच निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या असा एकमुखी निर्णय स्थानिक ग्रामस्थांनी घेतला आहे. ही शेतजमीन माहूर देवस्थानची आहे. त्यामुळे येथील शेतीवर शासनाकडून मिळणाऱ्या विविध सोयी सवलतीपासून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना वंचित राहावे लागत आहे. म्हणून या शेतजमिनी आमच्या नावावर करण्यात याव्यात अशी मागणी करीत निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. वणीचे उपविभागीय महसूल अधिकारी डॉ. शरद जावळेकर, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुजलवार, शिरपूरचे ठाणेदार गजानन करेवाड या ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांनी मागण्या समजून घेऊन बहिष्कार मागे घेण्याचे आवाहन केले आहे. याबाबत न्यायालयात खटला दाखल असल्याने शासन निर्णय घेऊ शकत नाही, असे एसडीओ जावळेकर यांनी सांगितले. मात्र, त्यानंतरही ग्रामस्थ त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रत्येक घडामोडीसाठी हा लाईव्ह ब्लॉग फॉलो करा...