Ahmadnagar Ijtema : अहमदनगरच्या (Ahmadnagar) बाराबाभळी येथे आजपासून दोन दिवशीय इज्तेमाचे (Ijtema) आयोजन करण्यात आले आहे. या इज्तेमासाठी जवळपास एक लाख मुस्लिम बांधव (Muslim Community) येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर 100 एकरवर मंडप तसेच पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून, आरोग्य व्यवस्था, ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था तसेच मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे.


अहमदनगर जिल्ह्यातील बाराबाभळी ग्रामपंचायत (Barababhbli Grampanchayat) हद्दीतील जामिया मोहमदिया इशातुल उलूम मदरशाच्या मैदानात आज-उद्या अशा दोन दिवशीय इज्तेमा आजपासून सुरु झाला आहे. या पार्श्वभूमीवर बाराबाभळी येथे मुस्लिम बांधव यायला सुरुवात झाली असून आज दिवसभर दिल्ली आणि पुणे येथील धर्मगुरू मुस्लिम बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान इज्तेमाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर पाथर्डी रस्त्यावर मोठया प्रमाणात मुस्लीम बांधवांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन तसेच रस्ते वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन वाहतुकीची कोंडी होऊ नये आणि रहदारी सुरळीत होण्यासाठी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी वाहतुकीत बदल केला आहे. 



त्यानुसार 16  डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते 17 डिसेंबर 2022 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत अहमदनगर-पाथर्डी महामार्गावर वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. अहमदनगरकडून पाथर्डीकडे जाणारी सर्व प्रकारची हलकी वाहतूक सुरळीतपणे सुरू राहील. अहमदनगरकडून पाथर्डीकडे जाणारी सर्व प्रकारचे अवजड वाहतुकीकरीता मार्ग- जीपीओ चौक- चांदणी चौक मुट्ठी चौक-कडा-आष्टी मार्गे असा राहणार असून पाथर्डीकडून अहमदनगरकडे येणारे सर्व प्रकारची वाहने चाँदबीबी महाल पायथा -साळोरा बद्दीफाटा- मौजे सारोळा बद्दीमार्गे जामखेड महामार्गावरुन-अहमदनगर अशी जातील. हा आदेश इज्तेमा मेळाव्यास येणारे वाहने, शासकीय वाहने, रुग्णवाहिका, फायर ब्रिगेडची वाहने आणि इतर अत्यावश्यक कारणांमुळे स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेल्या वाहनांना लागू राहणार नसल्याचेही पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.


तर उद्या सायंकाळी इज्तेमामध्ये सहभागी झालेल्या मुस्लिम बांधवांची सामूहिक दुवा होणार आहे. त्यासाठी नगर शहरातील मुस्लिम बांधवांची उपस्थिती असणार आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवला आहे. त्याचबरोबर लाखो मुस्लिम बांधव येणार असल्याने ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली असून मुक्कामाची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. 


वाहतूकीत बदल 
अहमदनगर-पाथर्डी महामार्गावर वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. अहमदनगरकडून पाथर्डीकडे जाणारी सर्व प्रकारची हलकी वाहतूक सुरळीतपणे सुरू राहील. अहमदनगरकडून पाथर्डीकडे जाणारी सर्व प्रकारचे अवजड वाहतुकीकरीता मार्ग- जीपीओ चौक- चांदणी चौक मुट्ठी चौक-कडा-आष्टी मार्गे असा राहणार असून पाथर्डीकडून अहमदनगरकडे येणारे सर्व प्रकारची वाहने चाँदबीबी महाल पायथा -साळोरा बद्दीफाटा- मौजे सारोळा बद्दीमार्गे जामखेड महामार्गावरुन-अहमदनगर अशी जातील.