Nagpur District Gram Panchayat Election Results 2022 : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या काटोल, नरखेड मतदारसंघात आणि कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांच्या सावनेर मतदार संघात भाजपचे (BJP) दमदार एंट्री केली आहे. तर दुसरीकडे कामठी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार टेकचंद सावरकर, अमरावती जिल्ह्यातील मोर्शी-वरूडचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार आणि प्रहारचे फायरब्रॅंड नेते अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्या कुटुंबातील सदस्य उभे होते. या तिन्ही आमदारांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना सरपंचपदी निवडून आणले आहे. 


अनिल देशमुख यांचा गढ मानल्या जाणाऱ्या काटोल तालुक्यातील एकूण 27 जागांपैकी भाजपने 13 जागांवर विजय मिळवला आहे. तर कॉंग्रेसने तीन जागा, राष्ट्रवादी कॉंग्रेसने आठ जागा आणि अपक्ष व शेकाप यांनी तीन जागांवर विजय मिळवला आहे. तर नरखेड तालुक्यातही बावीस जागांपैकी दहा जागांवर भाजपने विजय मिळवला असून एका जागेवर कॉंग्रेस, सात जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि इतरांनी तीन जागांवर विजय मिळवला आहे. तर कॉंग्रेस नेते माजी मंत्री सुनील केदार यांच्या सावनेर तालुक्यातही 36 ग्रामपंचायतींपैकी सोळा जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. तर 14 जागांवर कॉंग्रेसने विजय मिळवला आहे. सहा जागांवर इतरांनी विजय मिळवला आहे.


ग्रामपंचायतीची निवडणूक म्हणजे अतिशय अटीतटीची. कमी लोकसंख्या असल्याने याची समीकरणे दररोज बदलत असतात. त्यामुळे गावातील मतदारांना आकर्षित करणे पुढाऱ्यांपुढे आव्हानात्मक ठरते. त्यामुळेच विधानसभेची निवडणूक परवडली, पण ग्रामपंचायतीची निवडणूक नक्को रे बाबा…असे म्हणण्याची वेळ येते. त्यामुळे गावाच्या निवडणुकीवर आमदारही बारीक लक्ष ठेऊन असतात. 


गावाकडे दुर्लक्ष नाहीच...


आज मतमोजणी सुरू असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये नागपूर जिल्ह्याच्या कामठी विधानसभा मतदारसंघाचे आमदार टेकचंद सावरकर, अमरावती जिल्ह्यातील मोर्शी-वरूडचे आमदार देवेंद्र भुयार आणि प्रहारचे फायरब्रॅंड नेते अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्या कुटुंबातील सदस्य उभे होते. या तिन्ही आमदारांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना सरपंचपदी निवडून आणले आहे. विधानसभेत प्रतिनिधित्व करीत असलो तरी गावाकडे दुर्लक्ष करीत नाही, असा संदेश या तीन आमदारांनी दिला आहे. 


13 पैकी 9 जागांवर उमेदवारांची 'व्हिक्ट्री'


अमरावती जिल्ह्यात अचलपूरचे आमदार बच्चू कडू आणि वरूड-मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या गावात ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. दोन्ही आमदारांनी आपआपली गावे साबूत ठेवली आहेत. बच्चू कडूंचे मूळ गाव बेलोरा येथे त्यांचे मोठे भाऊ भैय्यासाहेब कडू सरपंचपदी विजयी झाले. 13 पैकी 9 जागांवर त्यांचे उमेदवार निवडून आले. देवेंद्र भुयार यांच्या मोर्शी-वरूड तालुक्यातील गव्हाणकुंड या गावात त्यांनी वर्चस्व कायम राखले आहे. 


कॉंग्रेस समर्थित पॅनलचा 82 जागांवर विजय


अमरावती जिल्ह्यात (Amravati District) एकूण 257 ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. यामध्ये 5 ग्रामपंचायती अविरोध निवडून आल्या होत्या. यामध्ये कॉग्रेस समर्थीत पॅनलने 82 जागांवर विजय मिळविला. भारतीय जनता पक्ष 48, शिवसेना 8, प्रहार 32, वंचित 1, युवा स्वाभिमान 12, शिंदे गट 2, राष्ट्रवादी कॉंग्रेस 20, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खातेही उघडता आले नाही. तर अपक्ष व इतर लहान पक्षांनी 52 जागांवर विजय मिळविला आहे.


ही बातमी देखील वाचा


नागपूर जिल्ह्यात 236 पैकी 98 ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा; दुसऱ्या क्रमांकावर कॉंग्रेस…