Nagpurt Gram Panchayat Election Results : नागपूर जिल्ह्यातील (Nagpur District) 236 ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हाती आले आहे. या निकालांमध्ये भारतीय जनता पक्ष (BJP) समर्थित उमेदवारांनी सर्वाधिक ग्रामपंचायतींवर झेंडा फडकावला आहे. तर भाजप पाठोपाठ कॉंग्रेस (Congress) दुसऱ्य़ा क्रमांकावर तर राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) तिसऱ्या क्रमांकावर गेली आहे. मात्र या निवडणुकीत शिंदे गटाने (Eknath Shinde Sivsena) ठाकरे गटापेक्षा (Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray)) जास्त जागा मिळवल्या आहेत, हे विशेष. नागपूर 5 ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर जिल्ह्यात 236 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या.
कामठी तालुका...
जिल्ह्यातील 13 तालुक्यांपैकी कामठी तालुक्यात 27 ग्रामपंचायतींपैकी भाजप उमेदवारांनी 16 तर कॉंग्रेस उमेदवारांनी 11 जागांवर विजय मिळविला. या व्यतिरिक्त राष्ट्रवादी कॉंग्रेस, उद्धव ठाकरे शिवसेना आणि एकनाथ शिंदे सेनेला खातेही उघडता आले नाही. उमरेड तालुक्यात भाजप पाच, तर राष्ट्रवादीने दोन ग्रामपंचायतींवर विजय मिळवला. या ग्रामपंचायतींत इतर पक्षांना भोपळाही फोडता आला नाही.
हिंगणा, काटोल, रामटेक, नगरखेड, नागपूर ग्रामीण, कुहीमध्ये...
हिंगणा तालुक्यातील एकूण सात जागांपैकी भाजप पाच आणि राष्ट्रवादी दोन, काटोल तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींपैकी भाजप 13, राष्ट्रवादी 8, कॉंग्रेस 3, तर शेकाप आणि इतर लहान पक्षांनी 7 जागांवर विजय मिळविला. रामटेकमध्ये एकूण 8 पैकी भाजप 1, कॉंग्रेस आणि शिंदे सेना 3, नरखेड तालुक्यात 22 ग्रामपंचायतींपैकी भाजप 10, कॉंग्रेस 6, राष्ट्रवादी 2, नागपूर ग्रामीण मधील 19 पैकी भाजप 10, कॉंग्रेस 6, राष्ट्रवादी 2, कुही तालुक्यात एकूण 4 पैकी भाजप 1 आणि कॉंग्रेस 3 जागांवर विजयी झाली आहे.
सुनील केदार यांच्या गटात भाजपच्या 16 ग्रामपंचायती...
भिवापूर तालुक्यातील 10 ग्रामपंचायतींपैकी भाजप 5, कॉग्रेस 4 आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस 1, कळमेश्वरमध्ये एकूण 23 पैकी भाजप 4, कॉंग्रेस 17, उद्धव ठाकरे सेना 1 तर अपक्षांनी 1 ग्रामपंचायतीवर बाजी मारली आहे. माजी मंत्री आमदार सुनील केदार यांच्या सावनेर तालुक्यात एकूण 36 ग्रामपंचायतींपैकी भाजप 16, कॉंग्रेस 14 आणि अपक्षांनी 6 जागांवर विजय मिळविला. पारशिवणी तालुक्यात 21 पैकी भाजप 5, कॉंग्रेस 12, शिंदे सेना 2, तर अपक्षांनी 2 ग्रामपंचायती काबीज केल्या. मौदा तालुक्यात 25 पैकी भाजप 11, कॉंग्रेस 9, राष्ट्रवाद 2, तर प्रहार पक्षाने 1 ग्रामपंचायत ताब्यात घेतली आहे.
बावनकुळेंचा दावा ठरला...
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सकाळी घोषित केल्याप्रमाणे नागपूर जिल्ह्यात तरी भाजपने निम्म्यापेक्षा जास्त जागा जिंकल्याचे दिसत आहे. पण ग्रामपंचायतीची निवडणूक राजकीय पक्षांच्या चिन्हावर लढली जात नाही. निकालानंतर ग्रामपंचायतींवर दावे-प्रतिदावे केले जातात. त्यामुळे आगामी काळात हा आकडा स्पष्ट होत जाणार आहे. कुणाकडे किती ग्रामपंचायती आल्या, हे स्पष्ट होण्यासाठी काही काळ वाट बघावी लागणार आहे.
नागपूर जिल्ह्यातील 236 ग्रामपंचायतीपैकी 200 जागी काँग्रेस विजयी, नाना पटोले यांचा दावा
नागपूर जिल्ह्यात 236 पैकी 200 ग्रामपंचायतींवर काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला असून भाजपला 36 जागाही मिळाल्या नाहीत, असा दावा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नागपूर जिल्ह्यातील फेटरी गावातही काँग्रेसचा विजय झाला असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. भाजपा विजयाचे खोटे दावे असून दुस-याच्या घरी पोरगा झालातरी भाजपवाले लाडू वाटतात, असेही यावेळी पटोले यांनी सांगितले. विधानपरिषद निवडणुकापांसून भारतीय जनता पक्षाच्या पराभवाची मालिका सुरू झाली असून नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीनंतर आता ग्रामपंचायतमध्येही पराभव केला असल्याचा दावाही यावेळी पटोले यांनी केला आहे.
ही बातमी देखील वाचा