रत्नागिरी : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीतील संगणक परिचालक सध्या एप्रिल महिन्यापासून पगाराविना काम करत आहे. जिल्ह्यातील 845 ग्रामपंचायतींमधील 550 संगणक परिचालक सध्या पगाराच्या प्रतिक्षेत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या माध्यामातून 2011 पासून 'आपले सरकार सेवा केंद्रांतर्गत' हा प्रकल्प सुरु आहे. या प्रकल्पामध्ये राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरावर काम करणाऱ्या संगणक परिचालकांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान, ही यंत्रणा राबवण्यासाठी एकाच कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून या कंपनीकडून परिचालकांचे मानधन वेळेवर देण्यात आलेले नाही. शिवाय, ग्रामपंचायतींना लागणारी स्टेशनारी पुरविण्याचे कंत्राट देखील या कंपनीला देण्यात आले आहे. परिणामी आता सारी परिस्थिती पाहता संबंधित कंपनी तुपाशी तर संगणक परिचालक उपाशी अशीच सध्याची अवस्था आहे. संगणक परिचालक ग्रामीण भागातील जनतेला रहिवासी बांधकाम परवानासह 29 प्रकारचे परवाने, जमा - खर्चाची नोंद, ग्रामसभा, मासिक सभेचे ऑनलाईन कामकाज, जणगणना, घरकुल सर्व्हे, प्रधानमंत्री पिकविमा योजना इत्यादी कामे केली जातात.
काय आहे संघटनेचं म्हणणं?
याबाबत 'एबीपी माझा'नं संगणक परिचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष हरिष वेदरे यांनी ''सध्या आमची अवस्था बिकट आहे. यापूर्वी आम्ही विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत देखील हा प्रश्न नेला होता. तेव्हा त्यांनी हा प्रश्न तडीस नेऊ असं आश्वासन दिलं होतं. पण, सत्तेत आल्यानंतर त्यावर काहीही कारवाई झालेली नाही. वर्षाकाठी संबंधित कंपनीला 1 लाख ते 1.5 लाखांचा डीडी दिला जातो. पण, सप्टेंबर महिना सुरू झाला तरी अनेकांना एप्रिलचा पगार मिळालेला नाही. गेली अनेक वर्षे संगणक परिचालकांच्या मानधनाचा तिडा कायम आहे. याबाबत शासनाने गांभीर्यानं विचार करत संगणक परिचालक हे पद निश्चित या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र आयटी महामंडळाकडून नियुक्ती देणे गरजेचे आहे'', अशी प्रतिक्रिया दिली.
तर, आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे काम करतो. पण, आम्हाला एप्रिलपासून पगार मिळालेला नाही. घर कसं चालवणार? हा प्रश्न आम्हाला आता पडला आहे. काहींना दोन महिन्याचा पगार मिळालेला असला तरी अद्याप दोन महिन्याच्या पगाराची प्रतिक्षा अद्याप देखील असल्याची प्रतिक्रिया प्रिती घोसाळे या संगणक परिचालकानं दिली आहे.
कंपनीकडून आणखी काय कामं होतात?
संबंधित कंपनीला पगारासाठी जवळपास 12 हजारांची रक्कम दिली जाते. पण, केवळ 6 हजार रूपयेच संगणक परिचालकांना दिले जातात. उर्वरित पैसे हे स्टेशनरी पुरविण्यासाठी कंपनी वापरत असल्याचे सांगितले जाते. पण, प्रत्यक्षात मात्र स्टेशनरी देखील वेळेवर मिळत नसल्याची प्रतिक्रिया हरिष वेदरे यांनी 'एपीबी माझा'कडे दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :