मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करणारे ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, मिनी अंगणवाडी कार्यकर्त्या, अंगणवाडी मदतनीस, आशा वर्कर यांना नियमित वेतन आणि मानधनाव्यतिरिक्त एक हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली. सोबतच केंद्र सरकारच्या धर्तीवर या कर्मचाऱ्यांना 90 दिवसांसाठी 25 लाख रुपयांच्या विम्याचं कवचही मिळणार असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं. सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना 50 लाखांचं विमा कवच देणार असल्याचं केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच जाहीर केलं होतं.
हा खर्च चौदाव्या अर्थ आयोगाच्या निधीतून भागवण्याबाबत सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयाचा राज्यातील सुमारे 2 लाख 73 हजार कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
ग्रामीण पातळीवर या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत उपाययोजना करण्यात येत आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी आवश्यक ते निर्देश दिले आहेत. त्यानुसार ग्रामपंचायत स्तरावर सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्त्या, मिनी अंगणवाडी कार्यकर्त्या, अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्त्या लोकांमध्ये जनजागृती, स्वच्छता मोहीम राबवणे, आरोग्याची काळजी घेणे, आवश्यकतेनुसार सर्वेक्षण करणे इत्यादी कामे जिवाची पर्वा न करता अहोरात्र मेहनत घेऊन करत आहेत. हे कर्मचारी जोखीम पत्करुन ही कामं करत असल्याने, त्यांना मिळणाऱ्या नियमित वेतन, मानधनाव्यतिरिक्त एक हजार रुपये इतकी प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येणार आहे, असं हसन मुश्रीफ म्हणाले.
प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजअंतर्गत केंद्र सरकारने सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी न्यू इंडिया ॲश्युअरन्स कंपनीमार्फत 90 दिवसांसाठी 50 लाख रुपयांचा विमा उतरवला आहे. त्याच धर्तीवर ग्रामपंचायतीअंतर्गत ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्त्या, मिनी अंगणवाडी कार्यकर्त्या, अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्त्यांचा 90 दिवसांसाठी 25 लाख रुपयांचा विमा उतरवण्यास मान्यता देण्यात आली आहे, असंही ग्रामविकास मंत्र्यांनी नमूद केलं.