मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा 302 वर गेला आहे. कोरोनाशी आपली लढाई सुरूचं आहे. आज दिवसभरात कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात होणार असल्याच्या बातम्या कानावर येत आहे. मात्र कुणाच्याही पगारात कपात केली जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिले.

उद्धव ठाकरे म्हणाले, सरकारी कर्मचाऱ्यांची वेतन कपात केली नाही. फक्त कर्मचाऱ्यांच्या पगाराची टप्प्यात विभागणी केली आहे. कोरोनानंतर आर्थिक संकटालाही तोंड द्यायचं आहे. वेतन कपात केली आहे, असा गैरसमज करू नका फक्त आपल्याला आर्थिक घडी नीट बसवण्यासाठी ही मांडणी करण्याचा  निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कुणाचाही पगार कापला जाणार नाही.

सध्या उन्हाळा सुरु आहे. गरमी वाढली म्हणून एसी लावू नका, थंड पेय टाळा, थंड पाणी किंवा सरबत पिऊ नका. हे कोरोनाचा उपाय म्हणून मी सांगत नाही. मात्र यामुळे सर्दी किंवा खोकला झाला तर चिंता वाढू शकते. घरात एसी असेल तर तो देखील लावू नका. त्यापेक्षा दारं खिडक्या उघडा, मोकळी हवा घरात येऊ द्या, असंही आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.

महत्तावाचे मुद्दे : 

  • कोरोनानंतर आर्थिक संकटालाही तोंड द्यायचं आहे

  • अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांकडून आभार

  • परदेशातून परतलेल्यांनी माहिती लपवू नये

  • गरीब मजुरांनी राज्यातून बाहेर जाऊ नये

  • इतर राज्यातील मजुरांची सरकारने जबाबदारी घेतली

  • अन्न- धान्याचा साठा पुरेसा आहे, तुटवडा भासणार नाही

  • राज्य सरकारकडे जीवनावश्यक वस्तूंचा भरपूर साठा

  • बाजार, किराणा दुकानात गर्दी नको

  • सर्दी,खोकल्याची लक्षणं असल्यास, सरकारी रूग्णालयात जा

  • खासगी दवाखान्यांची गरज आहे, बंद ठेऊ नका

  • मजुरांनी आहात तिथेच थांबा, स्थलांतर करू नका

  • राज्यांच्या सीमा बंद,अनावश्यक गर्दी टाळा



राज्यात चाचणी केंद्र वाढले आहेत, त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. अजून आपण काळजी घेतली तर विषाणूचा हल्ला परतवून लावू शकतो या स्थितीत आहोत, धोका आहे पण त्यामुळे घाबरून जाऊ नये, गर्दीही करू नये असेही मुख्यमंत्री म्हणाले. रुग्ण बरे होऊन घरी जात असल्याचे समाधान आहे. मुख्यमंत्री म्हणाले, केंद्र सरकारच्या यादीत सुरुवातीला जे देश नव्हते त्या देशातून जे नागरिक- पर्यटक आले, त्यांनी कोणतीही माहिती न लपवता पुढे यावे, लक्षण आढळली तर पटकन उपचार करून द्यावेत कारण योग्य वेळी उपचार झाले तर जीव वाचू शकतो.

एक हजार केंद्रात दोन लाख स्थालांतरितांना सुविधा

संपूर्ण देश लॉकडाऊन झालेला असल्याने इतर राज्यातील कामगार, मजूर यांनी स्थालांतर करणे ताबडतोब थांबवावे असे सांगितले असूनही लाखो लोक स्थालांतर करतांना दिसत आहे. या सर्वांची जबाबदारी महाराष्ट्र शासनाने घेतली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यांच्यासाठी राज्यात जवळपास 1 हजार केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. तर आज घडीला दोन- सव्वादोन लाख स्थालांतरीत लोक, मजूर यांची तिथे व्यवस्था करण्यात आली आहे. इतर राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील कामगार-मजूरांची ही ती राज्ये व्यवस्था करत आहेत. प्रत्येकजण माणूसकीचा धर्म पाळत आहेत. त्यांना अन्न, औषधं याचा पुरवठा केला जाईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

गणवेशधारी डॉक्टर योद्ध्याप्रमाणे भासले

नायडू रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सेसशी बोललो, त्यावेळी ते गणवेशधारी योद्ध्यासारखे दिसत होते. अत्यावश्यक सेवेत काम करणारे सर्व कर्मचारी, बेस्टचे ड्रायव्हर, एस.टीचे ड्रायव्हर, डॉक्टर, नर्सेस, सफाई कामगार, या सगळ्यांचे मला खुप कौतुक वाटते अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कामाचा गौरव केला.

Farmer Help for #Corona | मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत म्हणून शेतकऱ्याचा प्रयत्न | स्पेशल रिपोर्ट