मुंबई : महाविकास आघाडीच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत सहभागी केलं जात नसल्याचा आरोप करत काँग्रेस मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार होते. परंतु, त्यासाठी वेळ मिळत नव्हती. अखेर याभेटीसाठी मुहूर्त सापडला असून आज दुपारी दीड वाजता बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.


काँग्रेसच्या मंत्र्यांना सरकारमध्ये दुय्यम स्थान मिळत असून, धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत काँग्रेसच्या मंत्र्यांना सहभाग दिला जात नाही, असा मंत्री अशोक चव्हाणांचा आरोप आहे. राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांचा एक वर्ग तीनही पक्षात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला आहे. काँग्रेस मंत्री अशोक चव्हाण यांनी इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलताना हे वक्तव्य केलं होते.


महाविकास आघाडीतील तीन पक्षांपैकी एक असलेल्या काँग्रेस पक्षाने आपली नाराजी आता उघडपणे मांडली आहे. काँग्रेसचा आरोप आहे की, सरकारच्या धोरणात्मक निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत त्यांना सहभागी केलं जात नाही. काँग्रेसच्या नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी उद्धव ठाकरे राज्यातील वरिष्ठ काँग्रेस नेत्यांसोबत सोमवारी बैठक घेणार होते. परंतु, उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना पितृशोक झाल्यामुळे ही बैठक रद्द करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी ही बैठक पार पडणार होती, परंतु या बैठकीला काही योग आला नाही. आता मात्र या बैठकीला मुहूर्त सापडला असून आज दुपारी एक वाजता ही बैठक पार पडणार आहे.


सामनाचा एक स्वभाव आहे : संजय राऊत


शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून जुनी खाट कुरकुरतेय? या मथळ्याखाली अग्रलेख लिहिण्यात आला होता. या अग्रलेखातून काँग्रेसच्या नाराजी नाट्यावर प्रकाश टाकण्यात आला होता. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, 'मला वाटत नाही की, नाराजी नाट्य फार आहे. सामनाचा एक स्वभाव आहे. एखादी गोष्ट सांगताना आम्ही आमच्या पद्धतीने सांगतो. अधिक सोपी करून सांगतो. चांगली उदाहणंही देतो. काँग्रेस पक्ष हा देशातील सर्वात जुना पक्ष आहे. राजकारणात मुरलेला पक्ष आहे. त्यांचे नेते नवे आहेत, तसेच अनेक नेते जुने जाणतेही आहेत. खाट जुनी असली की कुरकुरते जास्त. कारण त्यांना त्यांच्या परंपरेच्या, आपल्या नेतृत्त्वाच्या जुन्या आठवणी जाग्या होतात. मग ते बोलायला लागतात. तसचं महाराष्ट्रात जे प्रमुख नेते आहेत, बाळासाहेब थोरात अत्यंत सयंमी नेते आहेत ते, दुसरे अशोकराव चव्हाण, जे राज्याचे मुख्यमंत्री होते. यांनी त्यांची भूमिका वृत्तपत्राच्या माध्यमातून, मुलाखतीतून मांडली.'


अपूर्ण माहितीमुळे आमच्याबद्दल चुकीचा संदेश जातोय : बाळासाहेब थोरात


जुनी खाट कुरकुरतेय? या मथळ्याखाली लिहिण्यात आलेल्या अग्रलेखावरून बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले होते की, 'आम्ही भक्कमपणे आघाडीसोबत आहे. आम्ही आमची भूमिका मुख्यमंत्र्याकडे मांडू. आमची भूमिका समजल्यावर मुख्यमंत्र्यांचं समाधान होईल. त्यानंतर सामनाने पुन्हा एकदा अग्रलेख लिहावा. अपूर्ण माहितीमुळे आमच्याबद्दल चुकीचा संदेश जातोय.'


महत्त्वाच्या बातम्या : 


आम्ही भक्कमपणे आघाडीसोबत, आमच्या भेटीनंतर 'सामना'ने पुन्हा अग्रलेख लिहावा : बाळासाहेब थोरात


खाट कितीही कुरकुरली तरी राहुल गांधी यांच्यासारखे मेकॅनिक दिल्लीत बसले आहेत : संजय राऊत