Governor Bhagatsingh Koshyari: विद्यासागर राव यांचा राज्यपालपदाचा कार्यकाल संपल्यानंतर भगतसिंह कोश्यारी यांचं नाव महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून पुढं आलं. भाजप-शिवसेनेचं सरकार असताना म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना कोश्यारींची एन्ट्री राज्यात झाली. संघाचा हार्डकोअर स्वयंसेवक ते भाजपकडून उत्तराखंडचे मुख्यमंत्री राहिलेले भगतसिंह कोश्यारी आल्यापासून चर्चेत राहिले. याची बरीच कारणंही आहेत. नंतर राज्यात राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्या अन् महाविकास आघाडीचं सरकार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सत्तेत आलं. इथून खरी सरकार विरुद्ध राज्यपाल अशी लढाईच सुरु झाली. याला राजकीय कारणं बरीच असली तरी यात महत्वाचा मुद्दा राहिला राज्यपालांची सातत्यानं येणारी वादग्रस्त वक्तव्यं.


महाराष्ट्राचे भगतसिंह कोश्यारी यांचा राज्यपालपदाचा राजीनामा अखेर मंजूर करण्यात आलाय. कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केला असून, रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत.  गेल्या काही दिवसांत भगत सिंह कोश्यारी यांनी केलेली वक्तव्य वादग्रस्त ठरली होती. त्यामुळे विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. 


राज्यपाल कोश्यारींनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्यं करुन वाद ओढावून घेतला


सर्वात आधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईत बोलताना मुंबई-ठाण्यातील गुजराती आणि राजस्थानी लोकांबद्दल कौतुकाचे उद्गार काढताना मुंबई-ठाण्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. महाराष्ट्रामध्ये विशेष करून मुंबई आणि ठाण्यातून गुजराती किंवा राजस्थानी लोकांना काढू टाकले, तर तुमच्याकडे पैसेच उरणार नाही. मुंबईही आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते, पण ती आर्थिक राजधानी म्हणून ओळखलीच जाणार नाही, असं राज्यपाल म्हणाले आणि संतापाची लाट उसळली. 


यानंतर त्यांनी समर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल? असं वादग्रस्त वक्तव्य केल्याने पुन्हा अडचणीत आले. “चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? गुरुचं आपल्या समाजात मोठं स्थान असतं, तसंच छत्रपतींनी मला माझं राज्य तुमच्या कृपेने मिळालं आहे, असं समर्थांना म्हटलं,” अशा आशयाचं वक्तव्य कोश्यारींनी केलं होतं.     
 
पुण्यातील एका कार्यक्रमात भगतसिंह कोश्यारी यांनी सावित्रीबाई फुले यांच्याबाबत हसत हसत केलेल्या एका वक्तव्यामुळेही वाद निर्माण झाला होता. त्यांनी म्हटलं होतं की, "कल्पना करा की सावित्रीबाईंचं लग्न 10 वर्षी झालं, तेव्हा त्यांच्या पतीचं वय हे 13 वर्ष होतं. कल्पना करा की मुलगा मुलगी लग्नानंतर काय करत असतील? लग्न झाल्यानंतर काय विचार करत असतील? असं ते हसत हसत म्हणाले आणि टीकेचे धनी झाले


राज्यपाल कोश्यारींनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वत:ला शांतीदूत समजायचे. त्यामुळे देश कमकुवत झाला आणि बराच काळ तो कमकुवतच राहिला, असं वक्तव्य करुन पुन्हा वाद ओढावून घेतला.  पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत मला प्रचंड आदर आहे. पण त्यांचीही एक कमकुवत बाजू होती. ते शांतीदूत आहेत असं त्यांना नेहमी वाटायचं. देशासाठी त्यांचं योगदान मोठं आहे. पण त्यांच्या शांतीदूत या प्रतिमेमुळे देश कमकुवत झाला आणि हे बराच काळ पुढे सुरू होतं, असं राज्यपाल म्हणाले आणि त्यावरूनही प्रचंड वादंग निर्माण झाला.


काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात राज्यपाल कोश्यारी सहभागी झाले. यावेळी त्यांनी नितीन गडकरींची स्तुती करण्याच्या नादात पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांनी म्हटलं की, मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉ. भीमराव आंबेडकरा यांच्यापासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील, असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले. यानंतर राज्यपालांच्या विरोधात राज्यभर आंदोलनं झाली. 


लॉकडाऊनमध्ये  मंदिरे पुन्हा खुली करण्यावरुन वाद, विमानाच्या उड्डाणाला परवानगी न दिल्याने वाद, 12 आमदारांच्या नियुक्तीवरुन वाद, कुलगुरुंच्या नियुक्तीच्या अधिकारांवरुन वाद, अभिनेत्री कंगनाला भेटीची वेळ दिल्याने वाद असे एक नाही अनेक वाद राज्यपालांच्या कारकीर्दीत महाराष्ट्राने पाहिले. 


महत्वाच्या बातम्या


Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर, रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल