Governor Bhagat Singh Koshyari : भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरुन दूर करावं, या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी राज्यभरात विरोधकांनी रान उठवलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महापुरुषांची बदनामी केल्याप्रकरणी विरोधकांनी राज्यपालांची मागणी केली होती. त्यातच आता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या संदर्भात राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून राज्यपाल कोश्यारी यांनी ही माहिती दिली.
नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत (PM Modi Mumbai Visit) आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन आणि चिंतनात व्यतीत करु इच्छितो, अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज दिली. आता राज्यपालांना पदमुक्त केलं जाणार का हे पाहावं लागेल. दरम्यान भगत सिंह कोश्यारी यांनी सप्टेंबर 2019 मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला होता.
जीवनाचा उर्वरित काळ चिंतन, मननात घालवण्याचा मानस : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
"महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे, आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशीर्वाद मिळत राहिल," असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले असल्याचे राजभवनाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
12 डिसेंबर 2022 रोजी कोश्यारींचं अमित शाहांना पत्र
12 डिसेंबर 2022 रोजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं होती. या पत्रात त्यांनी संपूर्ण वादावर आपली भूमिका व्यक्त केली होती. महापुरुषांचा अपमान करण्याची आपला कोणताही उद्देश नव्हता असं त्यांनी सांगितलं होतं. गृहमंत्र्या यासंदर्भात मार्गदर्शन करण्याची विनंती केली होती. त्यानंतर आता हे प्रकरण शांत झालेलं असतानाच भगत सिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
विरोधकांकडून सातत्याने राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी
गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात आवाज उठवला होता. महाराष्ट्रातील मराठी माणूस, महापुरुषांचा अपमान यांसारख्या विविध मुद्द्यांवर राज्यपालांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती. राज्यपालांविरोधात राज्याच्या विविध जिल्ह्यात त्यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आलं होतं.
राज्यपालांना आधीच हटवायला हवं होतं : विरोधक
दरम्यान भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यपालपदाचा राजीनामा देण्याची इच्छा पंतप्रधानांकडे व्यक्त केल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने स्वागत केलं आहे. राज्यपालांना आधीच हटवायला हवं होतं, अशी प्रतिक्रिया काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून व्यक्त करण्यात आली.