जळगाव : भाजपला सोडचिठ्ठी देत नुकतंच राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुभेच्छा पत्र पाठवलं आहे. यामुळं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. एकनाथ खडसे यांच्यासह अन्य काही जणांची नावं राज्यपाल नामनिर्देशित जागांवर विधानपरिषदेत नियुक्तीसाठी आघाडी सरकारने राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठविली आहेत. यावर राज्यपाल काय निर्णय घेतात? याकडे सगळ्याच लक्ष लागलेले आहे. यातच राज्यपाल यांनी खडसे यांच्या विधानसभेतील योगदान आणि सामाजिक कार्याबद्दल सुनील नेवे लिखित 'जनसेवेचा मानबिंदू' या पुस्तकाच्या निमित्ताने खडसे यांचं कौतुक करत त्यांना यशाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


विधानपरिषदेवर घेण्यासाठी एकनाथ खडसे यांच्यासह बारा जणांच्या नावाची शिफारस महा विकास आघाडी सरकारने राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठविली आहे. त्यावर अद्याप निर्णय प्रलंबित आहे. असे असताना खडसे यांच्या जीवनावर पुस्तकासाठी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी खडसे यांच्या कार्याचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क वितर्क लढविले जात आहे.


एकनाथ खडसे यांच्या जीवनावर आणि त्यांच्या कार्याबद्दल प्रा सुनिल नेवे यांनी 'जनसेवेचा मानबिंदू' नावाचे पुस्तक लिखाण केले होते. या पुस्तकाचा काही महिन्यांपूर्वी प्रकाशन सोहळा पार पडला होता. या नंतर या पुस्तकाची एक प्रत राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे अवलोकनार्थ पाठविण्यात आली होती.


त्याला उत्तर देताना राज्यपाल यांनी म्हटलं आहे की, 'या पुस्तकाच्या माध्यमातून खडसे यांच्या सामाजिक ,राजकीय आणि विधानसभेतील योगदानाबद्दल अभ्यासपूर्ण आलेख या पुस्तकातून मांडण्यात आला आहे. या बद्दल आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपणास सुयश चिंतितो'.



राज्यपालांनी 1 ऑक्टोबर रोजी लेखी पत्राद्वारे दिलेल्या या शुभेच्छा जळगाव आणि खानदेशातील राजकीय वर्तुळात मात्र चर्चेचा विषय बनला आहे.