मुंबई : सर्वसामान्यांसाठी असलेल्या योजनांवर अमल करणाऱ्या अधिकाऱ्यांनीच डल्ला मारला तर त्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचणार कशा असा सवाल उपस्थित होत आहे. कारण दोन IAS अधिकाऱ्यांनी सामान्यांच्या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे. अनुसूचित जातीच्या योजनेवर दोन IAS अधिकाऱ्यांनी डल्ला मारल्याचं समोर आलं आहे. सामाजिक न्याय विभागाच्या परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ IAS अधिकाऱ्यांनी आपल्याच मुलांना मिळवून दिला असल्याचं हे प्रकरण आहे. यात IAS अधिकारी श्याम तागडे आणि मिलिंद शंभरकर यांचा समावेश आहे.


श्याम तागडे आणि मिलिंद शंभरकर यांनी आपल्याच मुलांना सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्तीचा फायदा करून दिला आहे. श्याम तागडे सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव आहेत त्यांनी आपला मुलगा आरुष तागडे याला सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती अंतर्गत ऑस्ट्रेलिया मधील सिडनी विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवून दिला आहे तर मिलिंद शंभरकर यांनी मुलगी गाथा शंभरकर हिला अमेरिकेतील विद्यापीठात या योजनेचा फायदा मिळवून दिला आहे.


यासंदर्भात IAS श्याम तागडे यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की, शिष्यवृत्तीबाबत नियमानुसार प्रक्रिया झाली आहे. माझ्या मुलाने जुलै मध्ये अर्ज केला होता. माझी पोस्टिंग खात्यात ऑगस्टमध्ये झाली आहे. मी याबाबत मंत्री आणि मुख्य सचिवांना देखील सांगितलं होतं. आणि या निवड प्रक्रियेत मी नव्हतो, असं तागडे यांनी सांगितलं आहे.


यापूर्वी फडणवीस सरकारच्या कार्यकालात तत्कालीन सचिव दिनेश वाघमारे आणि सहसचिव दिनेश डिंगळे यांनी अशाच पद्धतीने आपल्या मुलांना फायदा मिळवून दिला होता. तर तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनीही आपल्या नातेवाईकाला लाभ मिळवून दिला होता. मात्र टीका झाल्यावर ती नाव वगळण्यात आली होती. अनुसूचित जातीतील गरीब मुला मुलींसाठी असलेल्या योजनेचा लाभ अधिकारीच घेत असल्याचा पुन्हा एकदा समोर आले आहे. आता यावर काय कारवाई होते याकडे लक्ष लागून आहे.