यवतमाळ : सामाजिक अर्थसहाय्य योजनेतून अपघातग्रस्तांना केलेल्या शासकीय मदतीचा चेक तीन वेळा बाऊन्स झाल्याने लाभार्थ्यालाच बँकेने दंड ठोठावला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ही घटना आहे.

यवतमाळमध्ये 14 डिसेंबर रोजी कार्यक्रम घेऊन ही शासकीय मदत वितरित करण्यात आली. लाभार्थ्यांना धनादेश देण्यात आले होते. मात्र धनादेश घेऊन गेल्यावर संबंधित खात्यात पुरेसे पैसेच नाही, या कारणाने शासकीय मदतीचा धनादेश अनादरीत झाला.

यवतमाळच्या गौतमनगरात राहणाऱ्या सपना इंगळे या महिलेचे पती दीपक इंगळे यांचा 14 मार्च 2017 रोजी विजेचा करंट लागून मृत्यू झाला होता. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्य योजनेतून 20 हजार रुपयांचा धनादेश मिळाला. तहसीलदारांच्या स्वाक्षरीचा हा धनादेश घेऊन सपना इंगळे तीन वेळा स्टेट बँकेत गेल्या. मात्र तिन्ही वेळा चेक बाऊन्स झाला.

धनादेशही बाऊन्स होतो, हे पाहून गरीब लाभार्थी महिला संभ्रमात पडली आहे . त्यावरही बँकेने चेक देणाऱ्याऐवजी लाभार्थ्यावरच दंड आकारला. या संदर्भात यवतमाळचे तहसीलदार सचिन शेजाळ यांना विचारणा केली असता याबाबत तपास आणि चौकशी करू, असं आश्वासन त्यांनी दिलं.

लोकांच्या घरी घरकाम करून सपना आता दोन मुलं आणि सासऱ्यांचा सांभाळ करतात. मात्र या सरकारकडून मिळालेल्या मदतीसाठी मात्र त्यांना आर्थिक भुर्दंडासह मनस्ताप सहन करावा लागला आहे.