उस्मानाबाद : अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि संस्कृतीबाबत मोदी आणि फडणवीस सरकारची काही धोरणं निश्चित चुकल्याची प्रतिक्रिया बडोदा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुखांनी दिली आहे.
उस्मानाबादमध्ये आज झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमानंतर ते एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. 16 ते 18 फेब्रुवारी दरम्यान बडोद्यात 91 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे.
देशभरात गोरक्षेच्या नावाखाली कथित गोरक्षकांकडून होणाऱ्या हल्ल्यांवरुन लक्ष्मीकांत देशमुख यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं. त्याचप्रमाणे साहित्य संमेलनात राजकारण्यांनी हस्तक्षेप करुन नये, असा सडेतोड सल्लाही त्यांनी दिला.
''आधीच्या सरकारमध्ये आणि या सरकारमध्ये कोणताही फरक नाही. घटना बदलण्याचा प्रयत्न सनसनाटीपणाचा आहे. घटना बदलणं शक्य नाही. सध्या वातावरणात तणाव दिसतो, पण अभिव्यक्तीला दडपण्याचा प्रयत्न सर्वच सरकारकडून केला जातो'', असंही देशमुख म्हणाले.
''अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे. पुरस्कार वापसी टोकाचं पाऊल आहे, कलाकार, साहित्यीकांना व्यक्त होता आलं पाहिजे. कलावंताच्या अभिव्यक्तीमध्ये कोणताही अडथळा येऊ नये'', असं स्पष्ट मत देशमुख यांनी व्यक्त केलं.