Pooja Khedkar : आलिशान लाईफस्टाईल आणि मग्रुरी वागण्याने ट्रेनी असतानाच असतानाच वादात सापडलेल्या आयएएस पूजा खेडकर (Pooja Khedkar) कुटुंबाची आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ओबीसी आरक्षणाचा लाभ घेत पूजा आयएएस झाल्या. यासाठी आठ लाख रुपये उत्पन्न असल्याचं सर्टिफिकेट त्यांनी सादर केलं आहे. मात्र, त्यांच्या वडिलांनी म्हणजेच निवृत्त अधिकारी दिलीप खेडकर यांनी लोकसभा निवडणूक लढवताना 40 कोटींची संपत्ती दाखवली होती. मात्र, या कुटुंबीयांची मालमत्ता कितीतरी अधिक असण्याची शक्यता आहे. 


पूजा खेडकरच्या घराबाहेर किती आलिशान गाड्या?


पुण्यातील बाणेर भागातील या कुटुंबायांच्या आलिशान बंगल्याची किंमतच कित्येक कोटींमधे आहे. या आलीशान बंगल्यात पाच फोर व्हीलर कार आढळल्या. ज्यामध्ये पुजा खेडकर ज्या ऑडी कारवर लाल दिवा लावून फिरत होत्या ती ऑडी कार झाकून ठेवलेली आढळून आली. यामुळे खेडकर कुटुंबाने आठ लाख रुपयांची मर्यादा असलेला उत्पन्नाचा दाखला मिळवून ओबीसी आरक्षणाचा फायदा मिळवताना आपली मालमत्ता दडवली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.



बाणेर भागात आलिशान बंगला 


ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी जास्तीत जास्त आठ लाख रुपयांच्या उत्पन्नाची मर्यादा असते. मात्र, खेडकर कुटुंबियांची मालमत्ता पाहिल्यानंतर ही मर्यादा केव्हाच ओलांडण्यात आल्याचे स्पष्ट होतं आहे. बाणेर भागात या आलिशान बंगल्याचा नजारा पाहिल्यास किंमत लक्षात येते. ओम दीप नावाचा हा बंगला पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून बाणेरकडे निघाल्यानंतर उजव्या बाजूला आहे. मुख्य रस्त्याला लागून बंगला आहे. 


ऑडी कार झाकून ठेवली


या बंगल्यामध्ये एकूण पाच फोर व्हीलर म्हणजे पाच चार चाकी कार दिसून येतात. ज्यामध्ये ज्या ऑडी कारचा उपयोग पूजा खेडकर शासकीय कार्यालयांमध्ये जाण्यासाठी करत होत्या त्यावर नारंगी रंगाचा दिवा लावलेला आहे. ती ऑडी कार देखील या ठिकाणी झाकून ठेवण्यात आली आहे. झाकून ठेवलेल्या ऑडी कारबरोबर इतर चार फोर व्हीलर या बंगल्यात दिसतात. ज्यामध्ये एक पजेरो गाडी देखील आहे. त्या व्यतिरिक्त इतर तीन चार चाकी वाहन दिसून आली. 


मालमत्ता 40 कोटींहून अधिक असण्याची शक्यता


पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांनी जी लोकसभेची निवडणूक अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून लढवली होती. त्यांनी त्यांची मालमत्ता ही 40 कोटी रुपये असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. मात्र बाणेर भागातील हा बंगला कित्येक कोटींचा आहे. बाणेर भागातील मालमत्तांचे दर लक्षात घेता या आलिशान बंगल्याची किंमतच काही कोटींमध्ये आहे हे स्पष्ट होतं. त्यामुळे दिलीप खेडकर यांची मालमत्ता 40 कोटींहून अधिक असण्याची शक्यता आहे. 


एवढी मालमत्ता कशी मिळवली?असा प्रश्न


दुसरी बाब म्हणजे पूजा खेडकर यांच्या स्वतःच्या नावावर 17 कोटी रुपयांची मालमत्ता असल्याची माहिती आहेय वेगवेगळ्या ठिकाणी ज्या काही जमिनी सुद्धा आहेत. जर इतक्या मोठ्या प्रमाणात या खेडकर कुटुंबियांच्या नावावर संपत्ती जमा आहे, तर ही संपत्ती या खेडकर कुटुंबियांनी कशी मिळवली? पूजा खेडकर यांचे वडील सरकारी नोकर होते. त्यांचे आजोबा देखील अधिकारी होते आणि सरकारी नोकरीमध्ये राहून या कुटुंबांनी एवढी मालमत्ता कशी मिळवली?असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या कुटुंबीयांच्या मालकीची जर इतकी मालमत्ता आहे तर प्रामाणिकपणे अभ्यास करून यूपीएससीची परीक्षा देणाऱ्या एका होतकरु विद्यार्थ्यांची संधी या खेडकर कुटुंबीयांनी हिरावून घेतली आहे का?असाही प्रश्न उपस्थित होतो.


इतर महत्वाच्या बातम्या