बीड: बीडमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली निघणार आहे. साधारण अकरा वाजता जरांगे पाटील बीडमध्ये (Beed) दाखल होतील. शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे. यापूर्वी वाहतुकीच्या अडथळ्यामुळे जरांगे पाटलांच्या (Manoj Jarange Patil) सभेला पोलीस प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र, आता सर्व विभागाच्या परवानग्या जरांगे पाटील यांच्या सभेला देण्यात आल्या आहे.
मराठा समन्वयकांकडून मनोज जरांगे पाटील यांच्या सभेकरिता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात परवानगी मागण्यात आली होती. परंतु पोलीस विभागाकडून छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर सभा घ्यावी अशी विनंती करण्यात आली. परंतु आता सर्व विभागाच्या परवानग्या मिळाल्या असून छत्रपती शिवाजी महाराज चौकात जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. तर जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेल्या अल्टीमेटम हा लवकरच संपणार आहे. तत्पूर्वी आज ही सभा होते लवकरात लवकर सगे सोयरेचा अध्यादेश काढून आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी बीड मधील मराठा समाज बांधवांनी केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती आज बीडमध्ये मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली निघणार आहे. या रॅलीची तयारी पूर्ण झाली आहे. सकाळी 11 वाजता शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मुख्य मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीचा समारोप होणार आहे. त्यानंतर जरांगे पाटील यांचं भाषण होणार आहे.
शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर बीड शहरातील शाळांना सुट्टी जाहीर
मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज बीडमध्ये शांतता रॅली आणि जनसंवाद सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर बीड शहरात होणारी गर्दी लक्षात घेता बीड शहरातील सर्व शाळांना एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचं पत्र शिक्षणाधिकाऱ्यांनी काढलं असून सर्व प्राचार्य, मुख्याध्यापकांना सूचना दिल्या आहेत.
कसा असेल रॅलीचा मार्ग?
बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ही रॅली निघणार असून सुभाष रोड, माळीवेस चौक, अण्णाभाऊ साठे चौक, जालना रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ या रॅलीचा समारोप होणार आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भव्य अशी जाहीर सभा देखील होणार आहे. दरम्यान, या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी जवळपास 10 फूट उंच असं स्टेज देखील बनवण्यात आल आहे. दरम्यान ज्या ठिकाणी रॅलीचा समारोप होणार आहे आणि जिथे जाहीर सभा होणार आहे.
आणखी वाचा