Babanrao Taiwade : आम्हाला सन्मानपूर्वक वागणूक मिळाली, आमच्याशी चर्चा केली, तर आम्हीही तिसऱ्या आघाडीत जाण्याचा विचार करु असं सूचक आणि महत्वाचे वक्तव्य राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे (Babanrao Taiwade) यांनी केलं. कोणत्याही संघटनेला स्थैर्य लाभल्यानंतर ती संघटन राजकीय दृष्टिकोनातून विचार करु शकते. राष्ट्रीय ओबीसी महासंघ गेल्या 9 वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करत असून, आमचेही जे कार्यकर्ते व पदाधिकारी राजकारणात उतरु इच्छितात त्यांच्यासाठी आम्ही राजकारणात उतरण्याचा विचार करू शकतो असे तायवाडे म्हणाले.
तिसऱ्या आघाडीची चर्चा, सन्मानाने बोलावलं तर चर्चेसाठी जाणार
राजकारण उतरण्यासाठी विविध राजकीय पक्षांसोबत चर्चा होणे आवश्यक आहे. राजकीय पक्षांनी सन्मानाची वागणूक दिली, आमच्या मुद्द्यांना त्यांच्या जाहीरनाम्यात समाविष्ट केलं, तरच आम्ही त्या राजकीय पक्षांसोबत जाण्याचा विचार करु शकतो असे तायवाडे म्हणाले. अद्याप यासंदर्भात कुठलाही निर्णय घेतलेला नाही. मात्र, राज्यात सध्या तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू आहे. त्यांनी सन्मानाने चर्चेसाठी बोलावलं, तर आमची चर्चेची तयारी आहे असे बोलून तायवाडे यांनी तिसऱ्या आघाडीत जाण्याची संकेत दिले आहेत. दरम्यान, ओबीसी महासंघाच्या राजकारणात जाण्याच्या या संकेतांचा दुराव्यानेही मनोज जरांगे यांच्या राजकीय महत्त्वकांक्षेशी संबंध नाही असेही तायवाडे म्हणाले.
पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घेणार
राष्ट्रीय ओबीसी महासंघ खरच राजकारणात उतरेल की नाही, हे अद्याप निश्चित नाही. त्याबद्दल आमच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करु अशी माहिती बबनराव तायवाडे यांनी दिली आहे. दरम्यान, बबनराव तायवाडे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्यात वातावरण तापलं
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा (Maratha Reservation) आणि ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं, या मागणीवर ते ठाम आहेत. तसेच आरक्षण मिळाले नाही तर विधानसभा निवडणुकीत 288 जागांवर निवडणूक लढणार असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. तर दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये अशी मागणी ओबीसी समाजाचे नेते करत आहेत. त्यामुळं महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याच मुद्यावरुन विधीमंडळाच्या सभागृहात देखील गोंधळ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या: