बीड: लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची आज 68 वी जयंती. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात झालेल्या दुर्घटनेमुळे गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.


मात्र तरीही त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.

राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रितम मुंडे यावेळी परिवारासह गडावर उपस्थित राहणार आहेत.

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात नुकत्याच झालेल्या दुर्घटनेमुळे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेले सामाजिक उपक्रमांचे सर्व कार्यक्रम रद्द करून, शोकाकूल कुटुंबाच्या दुःखात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

'प्रमोदजी, मी गोपीनाथ मुंडे बोलतोय'

तशी विनंती पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री उमा भारती यांना केली होती.

कार्यक्रम रद्द करण्यात आले असले तरी महाराष्ट्राच्या विविध भागातून दरवर्षी लाखोंच्या संख्येने येणारे मुंडे भक्त यंदादेखील आपल्या लाडक्या नेत्याच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी गोपीनाथ गडावर दाखल होत आहेत.

'मी गोपीनाथ मुंडे बोलतोय, तुम्ही उदयनराजेंना अटक केलीय का?'

वैद्यनाथ साखर कारखाना हा लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांच्या पश्चात हा कारखाना त्यांच्या कष्टाचे आणि स्वप्नाचे प्रतिक म्हणून आमच्यासाठी हा जिवाभावाचा विषय आहे असे  पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

शोकाकूल परिवार हा कारखान्याशी अनेक वर्षे संबधित असल्यामुळे तो आमचाही परिवार आहे, त्यांना आर्थिक मदत करून त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी आम्ही घेतली आहे. या घटनेने परिवारातील सदस्य गेल्याचे दुःख झाले आहे, अशा भावना व्यक्त करुन पंकजा मुंडे यांनी संपूर्ण कुटूंबियांसह आज गडावर येणाऱ्या भक्तांसाठी सकाळी ११ वा. पासून उपलब्ध राहणार असल्याचे सांगितले आहे.

गोपीनाथ मुंडे यांचा अल्पपरिचय

  • महाविद्यालयीन जीवनात गोपीनाथ मुंडे हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत होते.

  • 1975 मध्ये आणीबाणीच्या काळात त्यांनी कारावासही भोगला होता.

  • गोपीनाथ मुंडेंनी 1978 साली पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली. पण इथे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र ते बीड जिल्हा परिषदेवर निवडून गेले.

  • मुंडे 1980 मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले. मात्र पुढच्याच म्हणजे 1985च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा स्वत:च्याच परळी या मतदारसंघातून पराभव झाला.

  • त्यानंतर 1990ची विधानसभा निवडणूक ते सहज जिंकले. या काळात त्यांनी शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांच्या संबंधांवरुन रान उठवलं.

  • त्याचबरोबर दाभोळमधील एन्रॉन प्रकल्पाविरोधातही आवाज उठवला होता.

  • पुढे 1995च्या युती सरकारमध्ये ते राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. यावेळी त्यांच्याकडे गृह आणि ऊर्जा अशी दोन मंत्र्यालयं होती. यावेळी त्यांनी अंडरवर्ल्डविरुद्ध मोहीम उघडली. सर्वाधिक एन्काऊंटर याचवेळी झाले आणि अंडरवर्ल्डचा कणा मोडला.

  • यानंतर 1995, 1999 आणि 2004च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी सहज यश संपादन केलं.

  • 2009 मध्ये गोपीनाथ मुंडे पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. यावेळी ते लोकसभेतील भाजपचे उपनेतेही बनले.

  • तर 2014च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना भरघोस यश मिळालं. मुंडे फक्त दुसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेले असं नाही तर त्यांनी मोदींच्या सरकारमध्ये केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयही मिळालं होतं.

  • मात्र मंत्रिपदाचा भार स्वीकारल्यानंतर काहीच दिवसात त्यांचा अपघात झाला. 3 जून 2014 रोजी त्यांचं निधन झालं.

  • दिल्लीतील मोतीबाग परिसरात समोरुन येणाऱ्या इंडिका कारने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. गाडीच्या मागील सीटवर बसलेल्या गोपीनाथ मुंडेंना जबर मार बसला. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या मुंडेंवर एम्समध्ये उपचार सुरु होते. उपचारादरम्यानच त्यांना हृदयविकाराचा झटाका देखील आला. त्यानंतर सकाळी आठ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.


संबंधित बातम्या

'प्रमोदजी, मी गोपीनाथ मुंडे बोलतोय'