मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आज 77 वर्षांचे झाले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.


मात्र सध्या अधिवेशन सुरु असल्यानं शरद पवार हल्लाबोल यात्रेत सहभागी होणार आहे. तसंच यंदा राष्ट्रवादीतर्फे शेतकरी प्रश्नांवर राज्यभर हल्लाबोल आंदोलन केलं जात आहे. वयाच्या 77व्या वर्षी देखील शरद पवार हे राजकारणात प्रचंड सक्रीय आहेत. त्यांचा काम करण्याचा उत्साह आजही अनेक तरुणांना लाजवेल असाच आहे.

50 वर्षांची राजकीय कारकीर्द

देशाच्या राजकारणावर छाप पाडणाऱ्या मोजक्या नेत्यांपैकी शरद पवारांची गणना केली जाते. शेती, क्रीडा, साहित्य, विज्ञान अशा सर्वंच क्षेत्रात पवारांनी आपला ठसा उमटवला आहे. राजकारण, समाजकारणात रमणारे पवार हे क्रिकेटमध्येही तितकेच रमतात हे आजवर अनेकदा पाहायला मिळालं आहे. आपल्या 50 वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी अनेक चढ-उतारही पाहिले.

लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधानपरिषद या संसद आणि विधिमंडळाच्या सर्व सभागृहांचे प्रतिनिधीत्व करण्याचा मानही पवार यांना मिळाला आहे.

1967 पासून आतापर्यंत सातत्याने पवार निवडून आले आहेत. १९८४ मध्ये पवार पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर ते पुन्हा 1985 साली राज्याच्या राजकारणात परतले होते. 1991 मध्ये नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करण्याता आला होता. 1993 मध्ये राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यावर त्यांनी विधानपरिषदेवर निवडून जाण्याचा पर्याय स्वीकारला.
1993 साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर येथील परिस्थिती हातळण्यासाठी शरद पवारांकडे राज्याचं नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची ही त्यांची चौथी वेळ होती. पण 1995 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात युती सरकार निवडून आलं. 1996 साली पवार लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर पवारांनी सोनिया गांधींवर बरीच टीका केली. यावेळी पवारांनी काँग्रेसशी फारकत घेऊन 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. कालांतराने राष्ट्रवादीनं काँग्रेसशी आघाडी केली.

2004 साली पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या मंत्रिमंडळात शरद पवारांनी कृषी मंत्री म्हणून सूत्रं हाती घेतली. त्यानंतर 2009 साली पुन्हा मनमोहन सिंह यांचं सरकार सत्तेत आलं आणि पुन्हा एकदा पवारांवर कृषी मंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. दरम्यान, 2010 साली पवारांची आयसीसीच्या अध्यक्षपदीही निवड झाली होती. सध्या पवार राज्यसभेचे सदस्य आहेत.

संबंधित बातम्या :

जहॉं से गुजरे तुम्हारी नजरे, वहाँ से तुम्हे सलाम है, मोदींचे पवारांप्रती गौरवोद्गार

शरद पवार आम्हाला बाळासाहेबांच्या जागी : बाळा नांदगावकर

जन्मदिनी शरद पवार रस्त्यावर उतरणार, विरोधकांचा हल्लाबोल मोर्चा

राज्याच्या प्रश्नांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत साथ देईन : शरद पवार

पवारांच्या गाडीचं स्टेअरिंग उदयनराजेंच्या हातात