नागपूर : काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, कापसावरील बोंडअळी या मुद्द्यावरुन सरकारला घेरण्याची तयारी केली आहे.


विरोधकांनी आज विधीमंडळात एकत्रित मोर्चा काढला. त्याआधी आज विधीमंडळात कामकाज सुरु होताच त्याची झलक बघायला मिळाली.

कर्जमाफीच्या मुद्द्यावर आक्रमक होत विरोधकांनी विधीमंडळातील मोकळ्या जागेत येऊन जोरदार घोषणाबाजी केली.

पवारांच्या अंगठ्याचं ऑपरेशन

दरम्यान पवारांच्या पायाच्या अंगठ्याचं ऑपरेशन आणि प्रकृतीचा किरकोळ त्रास असूनही खुद्द शरद पवार आजच्या हल्लाबोल मोर्चाचं नेतृत्व करत आहेत. राष्ट्रवादीकडून शरद पवार आणि काँग्रेसकडून गुलाम नबी आझाद हे दोन्ही नेते या मोर्चाच्या अग्रभागी आहेत.

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारला जाब विचारण्यासाठी विरोधकांनी काढलेला हल्लाबोल मोर्चा आज विधानभवनावर धडकणार आहे.

या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसह, काँग्रेस, शेकाप, सपाचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

सत्ताधारी भाजप-शिवसेना युती सरकारने शेतकरी आणि सामान्यांच्या विषयांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत काँग्रेस-राष्ट्रवादीने हल्लाबोल मोर्चाचं आयोजन केलं आहे.

जन्मदिनी शरद पवार रस्त्यावर 
दरम्यान, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. पवार यांनी आज 77 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. पवारांनी आधीच राजकारणात 50 वर्ष पूर्ण केली आहेत. या राजकीय प्रवासात शरद पवारांनी महाराष्ट्र आणि केंद्रात अनेक महत्त्वाची पदं भूषणली आहेत.

30 वर्षांनी पवारांचं सरकाविरोधात आंदोलन
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार 30 वर्षांनी विद्यमान सरकारविरोधात आंदोलन करणार आहेत. याआधी 1985 मध्ये त्यांनी तत्कालीन राज्य सरकारविरोधात सायकल मोर्चा काढला होता. जळगावातून सुरु झालेला हा सायकल मोर्चा नागपुरात संपला होता.

पहिला दिवस विरोधकांनी गाजवला
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला कालपासून (11 डिसेंबर) सुरुवात झाली. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी विविध मुद्यावरुन सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शेतकऱ्यांची रखडलेली कर्जमाफी, आणि जाहिरातबाजीवर होणरा वारेमाप खर्च यासंदर्भात विरोधी पक्षातील नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. विरोधकांच्या गोंधळामुळे दोन्ही सभागृह दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली.

संबंधित बातम्या

माझा इम्पॅक्ट : पोलिसांना निकृष्ट जेवण देणाऱ्या केटररची हकालपट्टी

नेते तुपाशी, पोलीस उपाशी, डाळ-भात खाऊन पोलिसांची अधिवेशनाला सुरक्षा

राष्ट्रवादीचे आमदार बजोरिया महिला पोलिसांच्या अंगावर धावले

LIVE हिवाळी अधिवेशन: सरकारकडून 26 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या

नागपुरात आजपासून हिवाळी अधिवेशन, विविध मुद्द्यांवरुन विरोधक घेरणार