मुंबई : एकेकाळी सुसंकृत राजकारणासाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राची अधोगती आता यूपी-बिहारच्या दिशेने नव्हे तर त्याच्याही खाली होत असल्याचं चित्र आहे. राजकारणात बोलताना शब्द जपून वापरावेत, विरोधकांवर टीका करताना किमान अपशब्द वापरू नयेत हा नियम म्हणजे इतिहास झाला आहे. आता उठता-बसता एकमेकांना शिव्या दिल्याशिवाय राजकीय नेत्यांच्या दिवसाची सुरुवात होत नसल्याचं दिसतंय. नुकतंच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) त्याची निचांकी पातळी गाठली. जयंत पाटलांवर (Jayant Patil) टीका करताना थेट त्यांच्या वडिलांवर घसरले आणि गावातील पारावर शिव्या देतात तसे शब्द वापरले.
Gopichand Padalkar On Jayant Patil : जयंत पाटलांवर खालच्या भाषेत टीका
जयंत पाटील हे राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेले नेते. राज्यातील विविध खात्यांचे मंत्रिपद सांभाळताना त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली. सांगलीतील राजकारणावरही त्यांचे एकेकाळी वर्चस्व. गेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र जयंत पाटलांच्या वर्चस्वाला हादरा बसला. त्याचवेळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांचा वाद मात्र वाढला. तो इतका वाढला की, गोपीचंद पडळकरांनी पातळी सोडून त्यांच्यावर टीका केली.
जयंत पाटील हा बिनडोक माणूस, त्याला काही अक्कल नाही अशा शेलक्या शब्दात पडळकरांनी जयंत पाटलांचा समाचार घेतला. मात्र पुढे बोलताना मात्र त्यांनी पातळी सोडली. जयंत पाटील हे राजारामबापू पाटील यांची औलाद आहेत असं वाटत नाही असं पडळकर म्हणाले.
वरिष्ठांकडून समज, पण पडळकरांना समजत नाही
पडळकरांनी नुकतंच केलेलं वक्तव्य हे पहिलंच नाही, तर या आधीही शिवराळ भाषेच्या नावाखाली त्यांनी पवार कुटुंबीयांवर बोलताना अपशब्द वापरल्याचं दिसतंय. आमदार असतानाही त्यांच्या या कार्यात खंड पडला नाही हे विशेष. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने या आधीही त्यांना वेळोवेळी समज दिली आहे, पण ठोस अशी कारवाई केल्याचं दिसत नाही.
गोपीचंद पडळकरांनी केलेले वक्तव्य हे चुकीचं आहे, त्यांना समज दिली असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पडळकर हे तरुण नेते आहेत, भविष्यात त्यांना चांगली संधी मिळू शकते, त्यांनी जपून बोललं पाहिजे असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला.
Gopichand Padalkar Controversial Statements : गोपीचंद पडळकर यांची या आधीची वादग्रस्त वक्तव्यं
- जयंत पाटील हा राजारामबापू पाटील यांची औलाद वाटतं नाही, काही तर गडबड आहे.
- शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कोरोनो.
- शरद पवार यांना गेल्या 80 वर्षानंतर अक्कल यायला लागली आहे.
- महाराष्ट्रात जाती-जातीत भांडण लावणारा लांडगा कोण हे सर्वांना माहिती.
- सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, बाप मराठा अन् आई दुसरीच, पुण्यात एक कॉकटेल घर; पवार कुटुंबीयांचे नाव न घेता भाजपचे गोपीचंद पडळकर बरळले.
- धर्मांतरासाठी येणाऱ्या पादरीचा जो कुणी 'सैराट' करेल त्याला 11 लाखांचे देणार.
- रोहित पवार हा औरंगजेबाच्या वृत्तीचा, मला अजित पवारांच्या मुलांची चिंता वाटते. औरंगजेबाने सत्तेसाठी स्वतःच्या भावाचा घात केला.
- जयंत पाटील कासेला मोठे पण दुधाला नाही, त्यांनीच सांगलीच सर्वाधिक वाटोळं केलं.
- जयंत पाटील कपटी आणि नीच माणूस, आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम करु.
- मुस्लिम धर्मात अनेक जाती, पण ते त्यांच्यात लग्न करत नाहीत आणि आमच्या मुली बाटवतात. ज्याच्या डोक्यावर टीळा त्याच्याकडूनच माल खरेदी करा.
महाराष्ट्रातल्या जनतेला आता हे काही नवीन राहिलं नाही. अशा वाचाळविरांची गर्दी आता सर्वच पक्षात दिसून येते. मग त्या त्या पक्षांकडून अशा वाचाळविरांना काही वेळा 'समज' दिली जाते, तर काही वेळा पक्षनेतृत्वाकडून साफ दुर्लक्ष केलं जातं. जोपर्यंत अशी वक्तव्य करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत या प्रकाराला आवर बसण्याची शक्यता नाही. त्याचप्रमाणे जोपर्यंत पक्षातल्या वरिष्ठांनाच हे प्रकार थांबवावेसे वाटत नाहीत, तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही हेही तितकंच खरं.