सातारा : पुण्यातील पोलिसांना गुंगारा देऊन पसार झालेला गज्या उर्फ गजानन पंढरीनाथ मारणे याच्या सह सराईत गुन्हेगार म्हणून रेकॉर्डवर असलेल्या चौघांना सातारा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. जामिनावर तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर गजानन मारणेची त्याच्या समर्थकांनी तळोजा ते पुणे अशी जंगी मिरवणूक काढली होती. शेकडो वाहनांचा ताफा या मिरवणुकीत सहभागी झाला होता. महामार्गावर धुडगूस घालतल्यांनतर त्याच्यासह इतरही आरोपींना अटक करण्यात आली होती. एक गुन्हा दाखल झाल्यानंतर गज्या मारणेवर आणखी सात ते आठ गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत गज्या मारणे जामिनावर सुटून बाहेर पडला आणि तो फरार होण्यात यशस्वी झाला.


पुणे पोलिस शोध घेत असतानाच सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर पाचगणी या परिसरात गज्या मारणे आणि त्याचे साथीदार फिरत असल्याची माहिती सातारा पोलिसांना लागली होती. त्या नुसार जिल्हा पोलिस प्रमुख अजयकुमार बन्सल यांनी या परिसरातील सर्वच पोलिस ठाण्यांना रेकी करण्यास सांगितले होते. गज्या मारणे बसलेला असलेली गाडी मेढा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चौकात आल्यानंतर त्याला पोलिसांना पकडले. ज्यावेळी पोलिसांनी गज्याला ताब्यात घेतले तेंव्हा गाडीत इतरही तीन आरोपी होते. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर तिघेही सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. या चौघांची रात्री वैद्यकीय तपासणी करुन त्यांना पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.


कुख्यात गुंड गजा मारणे थेट न्यायालयात हजर, पोलिसांच्या हातावर तुरी देत जामीन मिळवला


पोलिसांच्या हातावर तुरी देत मिळवला होता जामीन
गजानन मारणेने पोलिसांच्या हातावर तुरी देत थेट न्यायालयातून जामीन मिळवला होता. पुण्याच्या वडगाव मावळ न्यायालयात हजर होत पिंपरी चिंचवड पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी त्याने अशा प्रकारे कारवाई टाळली होती. मुंबई, रायगड आणि पुणे अशा तीन जिल्ह्यातील पोलिसांच्या देखत अक्षरशः गाजावाजा करत गजानन घरी दाखल झाला होता. नंतर मात्र तो फरार झाला आणि त्याच्या शोधासाठी पिंपरी चिंचवड आणि पुणे पोलिसांची फौज त्याच्या मागावर होती. पण या दोन्ही पोलीस आयुक्तालयाच्या हातावर तुरी देत तो थेट वडगाव मावळ न्यायालयात हजर झाला आणि जामीन मिळवून मोकळाही झाला होता.