Bhandara Gondia Lok Sabha : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात (Bhandara Gondia Loksabha) नवनिर्वाचित खासदारांबद्दल काँग्रेसमध्ये (Congress) नाराजीचा सूर उमटतान दिसत असल्याचे पुढे आले आहे. काँग्रेसच्या तिकिटावर अटीतटीच्या निवडणुकीत निवडून आलेले खासदार प्रशांत पडोळे  (Prashant Padole) हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशिवाय प्रथमच 22 जुनला गोंदियात आले होते. आपल्या या दौऱ्यात खासदार प्रशांत पडोळे यांनी गोंदियातील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन यांची भेट घेऊन आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. तसेच काही खाजगी लोकानाही भेटले. मात्र, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि अन्य महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना याची पुसटसीही कल्पना दिली नाही. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते नाराज झाले आहेत.


नवनिर्वाचित खासदारांबद्दल काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर


निवडणुकीत विजयी झाल्यानंतर एखादा खासदार किंवा आमदार पहिल्यांदाच आपल्या क्षेत्रात आल्यास त्यांचे जल्लोषात स्वागत केल्या जातं. त्यानुसार खासदार प्रशांत पडोळे यांचे गोंदिया येथे आगमन होताच त्यांच्या आगमनाचे जल्लोषात भव्य स्वागत सोहळा व्हायला हवा होता, जनतेचे आभार मानण्यासाठी यात्रा काढायला हवी होती, मात्र तसे काहीही झाले नाही. खासदार आले आणि गोंदियातून निघून गेल्याचे सोशल मीडियातील काही छायाचित्रांमध्ये दिसून आले. परिणामी, त्यांच्या छूप्या दौऱ्यामुळे काँग्रेस संघटनेत नाराजीनाट्य रंगल्याचे दिसत आहे. 


तब्बल 25 वर्षानंतर भंडारा-गोंदिया मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार


भंडारा-गोंदिया लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाने भंडारा येथील प्रसिद्ध डॉ. प्रशांत यादवराव पडोळे यांना उमेदवारी दिली होती. डॉ. प्रशांत पडोळे हे गोंदिया जिल्ह्याचे सहकार महर्षी यादवराव पडोळे यांचे ते सुपुत्र आहेत. त्यांनी युक्रेन इथून वैद्यकीय शिक्षण घेतलं असून कोरोना काळात त्यांनी रुग्णसेवा करीत एक महत्त्वाचं योगदान दिलं. 25 वर्षानंतर पहिल्यांदाच काँग्रेसचा पंजा या चिन्हावरील उमेदवार उभा होत विजयी  झाल्याने मतदारांमध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळले. अशातच भंडारा- गोंदिया मतदारसंघातून महायुतीमध्ये भाजपकडून सलग दुसऱ्यांदा सुनील मेंढे यांना उमेदवारी मिळाली होती. मात्र, त्यात त्यांचा दारुण पराभव झाला. त्यामुळे हा विजय भंडारा गोंदिया मतदारसंघातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी महत्वाचा आहे.


अनेक दिवसांपासून स्थानिक स्थरावर कार्यकर्त्यांनी मोर्चे बांधणी करत महायुतीचा उमेदवार पाडण्यासाठी मेगाप्लॅन तयार केला होता. त्यामुळे या विजयानंतर प्रथमच जिल्ह्यात परतलेल्या खासदार प्रशांत पडोळे  यांचे जंगी स्वागत व्हावे, अशी अपेक्षा काँग्रेसमधील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना होती. मात्र तसे न झाल्याने कुठेतरी नवनिर्वाचित खासदारांबद्दल काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर बघायला मिळत आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या