परभणी : नाशकातील नगरसेविकेच्या घरातून चोरलेलं सोनं परभणीतून जप्त करण्यात आलं आहे. हेमलता पाटील यांच्या घरातून चोरी केलेली तब्बल 28 तोळ्यांची तीन सोन्याची बिस्किटं परभणीत विकल्याप्रकरणी पोलिसांनी सराफा व्यावसायिकासह चौघा जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण 12 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


नाशिकमधील नगरसेविका हेमलता पाटील यांच्याकडे विजय नाथभाजनने चोरी केली होती. जालन्यातील घनसावंगीचा असलेला विजय हा हेमलता पाटलांच्या वॉचमनचा मुलगा. पाटील यांच्या घरातून चोरी केलेलं सोन्याचं बिस्किट त्याने परभणीतील सेलुमधल्या सराफा मित्राला पाठवलं आणि विकायला सांगितलं.

विजयच्या मित्राने ते बिस्किट सेलूमध्ये दोन लाखांना विकलं. त्या व्यक्तीने पुन्हा हे बिस्किट दुसऱ्या व्यापाऱ्याला दोन लाख 70 हजारांना विकलं. याबाबत सेलूमध्ये चर्चा रंगल्यानंतर पोलिसांना ही बाब समजली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी याचा कसून तपास केल्यानंतर हे सोनं चोरीचं असल्याचं निष्पन्न झालं.

यावरुन विजय नाथभाजन, गौतम इंगळे, विठ्ठल बहिवाल, शिवाजी खुडे या चारही जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एकूण 28 तोळ्यांची तीन सोन्याची बिस्किटं आणि एक लाख 70 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.