Gokul Milk : कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. गोकुळ दूध (Gokul Milk News) संघाने खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर एक रुपयाची वाढ करण्यात आली आहे. दूध खरेदी दरातही वाढ केल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. 


कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) संघाशी सलग्न दूध उत्पादकांनी गाय दूध खरेदी दरामध्‍ये 1 रूपये वाढ केलेली आहे. 25 ऑगस्ट रोजी झालेल्या संचालक मंडळाच्‍या बैठकीत दरवाढीबाबत निर्णय घेण्यात आला होता, अशी माहिती संघाचे अध्‍यक्ष विश्‍वास पाटील यांनी दिली.


21 ऑगस्टपासून  गाय दूध खरेदी दर 3.5 फॅट व 8.5 एस.एन.एफ प्रतिचे दुधास प्रतिलिटर 31 रूपये  असा दर राहिल अशी माहिती विश्वास पाटील यांनी दिली आहे. विश्वास पाटील म्हणाले, गाय दूध खरेदी दरात वाढ चार वेळा करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला आहे. तसेच सुधारित दरपत्रक संघामार्फत प्राथमिक दूध संस्थाना पाठवण्यात येणार आहेत.


कोरोना संकटाचा मोठा फटका सर्व क्षेत्रांना बसला होता. दूध उत्पादक शेतकऱ्यांना देखील याचा फटका बसला होता. सध्या जनावरांसाठी लागणाऱ्या खाद्यांच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. अशा स्थितीत गोकुळ दूध संघाने दुधाच्या दरात केलेली वाढ शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे.  महागाईच्या काळात दूध दरात झालेली दरवाढीमुळं शेतकऱ्यांना हातभार लागणार आहे.


गोकुळ'चं दूध एका वैशिषट्यपूर्ण पॅकिंग असलेल्या पिशवीतून वितरीत केले जाते.  या पॅकिंगचं वैशिष्ट्य म्हणजे यात पाच लेअर्स असतील. त्यामुळे एकदा दूध पॅक झालं की, त्यात भेसळ करणं अशक्य होईल. सध्या दररोज एकूण सरासरी 13 लाख लीटर दुधाची विक्री केली जात आहे. यात मुंबई शहरात एकूण सरासरी 9 लाख लीटर दुधाची विक्री केली जाते