Godavari River Pollution : ब्रह्मगिरी ते राजमुद्री असा तब्बल 1465 किलोमीटरचा प्रवाह असलेल्या गोदावरी नदीचा नांदेड हा मध्यबिंदू आहे. म्हणूनच नांदेडला गोदावरीचे नाभिस्थान आणि नदीला दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते. याठिकाणी सर्व धर्मियांची विविध श्रद्धास्थानं ही या गोदावरी नदी पात्रालगत आहेत. पण याच नदीला आता अक्षरश: गटाराचे स्वरुप आले आहे.


जगभरातील शीख धर्मियांचे श्रध्दास्थान सचखंड हुजुरसाहिब गुरुद्वारा, बंदाघाट, नगिनाघाट, शिकारघाट, लगरसाहिब गुरुद्वारा, या पवित्र गुरुद्वाराच्या पायथ्याजवळूनही नदीचा प्रवाह वाहतो. देशविदेशातून येणारे कोट्यवधी शीख भाविक पवित्र गोदावरीचे पाणी तीर्थ म्हणून सोबत घेऊन जात असतात. तर पवित्र सचखंड गुरुद्वाऱ्याचे तख्तस्नान मोठ्या भक्तिभावाने गोदावरी नदीच्या पाण्याने घातले जाते. तर नाभिस्थान म्हणून ओळख असल्याने कोट्यवधी हिंदूही जवळच्यांच्या मृत्यूनंतर त्यांना स्वर्ग प्राप्त व्हावा म्हणून विविध कार्य करण्यास या नदी काठावर येत असतात.


त्यामुळे धार्मिक आणि सामाजिक दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या गोदावरी नदीचे चित्र मात्र सद्यस्थितीला क्लेशदायक आहे. गोवर्धनघाट ते वाजेगाव बंधारादरम्यान नदीच्या पात्रातील पाणी सडले असून कचरा, प्लॉस्टिक यासोबतच शहरातील सांडपाणी अशा 26 नाल्यांद्वारे नदीच्या पात्रात मिसळत असल्याने परिसरातील दुर्गंधीत वाढ झाली आहे. तर महापालिकेचा मलनिस्सारण प्रकल्प फक्त नावालाच उरला असून महापालिका प्रशासन मात्र काहीच प्रयत्न करत नसल्याचे चित्र आहे. नदीपात्रा शेजारी दूषितपाणी शुद्ध करून नदी प्रवाहात सोडण्यासाठी बसवण्यात आलेले मलनिस्सारणचे पंपगृह मात्र अद्यपही बंदच आहेत. तर या विषयी महापालिका आयुक्त सुनील लहाने तसंच महापालिकेचे आयुक्त मलनिस्सारणचे अधिकारी यावर काहीही बोलण्यास तयार नाहीत.


जलचरांनाही धोका


गोदावरीनदीत सोडण्यात येणाऱ्या या दूषित पाण्यामुळे नदीचं पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहे. या दूषित पाण्यामुळे त्यातील विविध प्रजातीचे मासे, झिंगे, कासव, मगरी, पानसाप, पान कोंबडे, बगळे, मासे असे विविध जीव ही धोक्यात आले आहेत. तर पिण्याच्या पाण्याची योग्य सोय व्हावी आणि सिंचनाला पाणी मिळावे या उद्देशाने गोदावरी नदीच्या पात्रात बाभळी पासून ते जायकवाडी पर्यंत 11 बंधाऱ्याची साखळी उभारण्यात आली आहे. मात्र या बंधाऱ्यामुळे नदीचा प्रवाह खंडित झाल्याने वाहणारे पाणी एकाच ठिकाणी जमा होऊन प्रदूषनात झपाट्याने वाढ होत आहे.  


हे ही वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha