गोवा : गोव्यात निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली आणि आता दिवंगत भाजप नेते आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या सुपुत्र देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.  पणजीतून भाजप उमेदवार देतील अशी अपेक्षा आहे, असा विश्वासही मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी व्यक्त केला आहे.


आजपर्यंत कधी न्हवे ते निवडणुकीआधी गोव्यात गेल्या महिनाभरात सात जणांनी आपल्या आमदारकीचे राजीनामे दिले आहेत.  दिड वर्षांपुर्वी काँग्रेसचे माजी विरोधीपक्ष नेते बाबु कवळेकरांसह काँग्रेसचे इतर नऊ आमदार भाजपात दाखल झाल्याने भाजपसमोर आता पुढील निवडणुकीत उमेदवार देण्यावरुन पेचप्रसंग निर्माण झालेत. 


गोव्याची राजधानी असलेल्या पणजी मतदारसंघातही असंच काहीसं चित्र निर्माण झालं आहे. पणजी हा माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांचा पारंपारिक मतदारसंघ. पर्रीकरांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत बाबुश मोन्सेरातांनी भाजप उमेदवार जे एकेकाळी पर्रीकरांचे स्वीय सचीव होते त्या सिद्धार्थ कुंकळ्येकरांचा पराभव करुन विजय संपादन केला होता. कालांतराने ज्या 10 काँग्रेस आमदारांनी पक्षाला भगदाड पाडत भाजपात प्रवेश केला त्यात बाबुश मोन्सेरातांचा समावेश होता. किंबहुना यात मोठ्या घडामोडीत बाबुश मोन्सेरातांचा मोठा वाटा होता.


आता पर्रीकरांचे सुपुत्र उत्पल पर्रीकरांनी पणजीत भाजपच्या उमेदवारीसाठी दावेदारी सुरु केलीय. उत्पल यांनी गेल्या दीड वर्षांपासून पणजी मतदारसंघात लोकांच्या गाठीभेटीही सुरु केल्या आहेत. उत्पल पर्रीकरांनी भाजपच्या वरीष्ठ नेत्यांनाही पणजीत निवडणूक लढविण्याबाबतची त्यांची इच्छा बोलून दाखवली आहे. मनोहर पर्रीकर हे फक्त गोव्यापुरते नाही तर देश पातळीवरील भाजपचे नेते होते. त्यामुळे भाजप पर्रीकरांच्या मुलाला उमेदवारी देणार की त्यांना वगळणार याबाबत वेगवेगळ्या चर्चा आणि अंदाज बाधले जात आहेत. अशातच आता भाजप पणजीची उमेदवारी मला देणार असा विश्वास आपल्याला आहे आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीही तसं सिग्नल आपल्याला दिलं असल्याचा दावा उत्पल मनोहर पर्रीकरांनी केला आहे. 


बाबुश मोन्सेरात हे पणजीतील भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्या पत्नी शेजारच्या ताळगांव मतदारसंघाच्या आमदार आहेत आणि त्या सरकारमध्ये मंत्रीही आहेत. बाबुश मोन्सेरात यांनी फक्त पणजीतच नाही तर संपुर्ण तिसवाडी तालुक्यातील पणजीसह ताळगांव, सांताक्रुज, सांत आंद्रे या इतर तीन मतदारसंघामध्येही दावेदारी केली आहे. एकाबाजुला भाजप बाबुश मोन्सेरातांना त्यांचा ताळगांव हा पारंपारीक मतदारसंघ आणि त्याच्याबाजुच्या सांताक्रुज या दोन मतदारसंघाची जबाबदारी देऊन त्यांना पणजी मतदारसंघातून बाजुला सारणार असल्याचही बोललं जातंय. 


आता उत्पल पर्रीकरांनी रणांगणात उतरणार असल्याची घोषणा केली असल्याने भाजपसमोर पेचप्रसंग निर्माण झालाय. ज्या माणसाने गोव्यात शून्यापासून सुरुवात करुन भाजपला सत्तेपर्यंत नेऊन पोचवलं असा मनोहर पर्रीकरांच्या पुत्राला भाजप उमेदवारी देणार का याकडेन सर्वांच लक्ष लागून राहीलंय. जर भाजपने उमेदवारी दिली नाही तर अपक्ष लढण्याची तयारीही उत्पल यांनी ठेवलीय हे फार महत्त्वाचं.


महत्त्वाच्या बातम्या :