Goa : गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष, आमदार अलेक्सो रेजिनाल्डो लॉरेन्को यांनी सोमवारी विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे 2017 च्या निवडणुकीत 17 संख्याबळ असलेल्या काँग्रसकडे आता केवळ दोनच आमदार राहिले आहेत. पुढच्या काही महिन्यांमध्ये गोवा राज्यात निवडणुका होणार आहेत, अशातच काँग्रेसला हा धक्का बसला आहे.


अलीकडेच काँग्रेसच्या दोन आमदारांनी राजीनामा दिला होता. त्यांनतर आता पुन्हा आणदार अलेक्सो रेजिनाल्डो लॉरेन्को यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, काँग्रेसने गेल्या आठवड्यातच आगामी राज्य निवडणुकीसाठी आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात लॉरेन्कोचे नाव होते. दक्षिण गोवा जिल्ह्यातील कर्टोरिम विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे लॉरेन्को यांनी सोमवारी दुपारी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयात आपल्या आमदारकीचा राजीनामा सादर केला. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचाही राजीनामा दिला आहे.


तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेशाची शक्यता
अलेक्सो लॉरेन्को लवकरच ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस पक्षात सामील होऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला गोव्याचे माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर काही महिन्यांपूर्वी माजी मुख्यमंत्री लुइझिन्हो फालेरो यांनीही काँग्रेस सोडून तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. त्यांनीही गोवा विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.


2017 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 40 पैकी  17 जागा जिंकल्या होत्या. गोव्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता. परंतु, 13 जागा मिळविणाऱ्या भाजपने राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी काही प्रादेशिक पक्ष आणि अपक्षांशी त्वरीत करार केला. काँग्रेसचे विश्वजीत राणे यांनी काँग्रेसचाच हात सोडला आणि भाजपात गेले. तर जुलै 2019 मध्ये विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांच्यासह काँग्रेसच्या 10 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला केल्यानं 17 वरुन काँग्रेसचे फक्त 5 आमदार राहिले होते. आता अलेक्सो लॉरेन्को यांनीही राजीनामा दिला आहे. राज्याचे दोन माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे मोठे नेते लुइझिन्हो फालेरो आणि रवी नाईक यांनीही पक्ष सोडल्याने काँग्रेसची गोव्यात काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आता काँग्रेसमध्ये फक्त दिगंबर कामत हा मोठा चेहरा सोबत आहे. काँग्रेसने सध्या विजय सरदेसाईंच्या गोवा फॉरवर्डसोबत निवडणुकीसाठी युती केली आहे. पक्षाला राम राम करणाऱ्या नेत्यांच्या जाण्याने पक्षाचे कोणतेही नुकसान होणार नसल्याचे दिगंबर कामत यांनी म्हटले आहे. दरम्यान, येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसची अवस्था यापेक्षा जास्त खराब होणार असल्याचे भाजपने म्हटले आहे. त्यामुळे आता राहिलेले विद्यमान आमदार भाजपमध्ये जातात की इतर कोणत्या पक्षात जाणर की काँग्रेसमध्येच राहणार हे पाहण देखील महत्त्वाचं ठरणार आहे.


 


महत्त्वाच्या बातम्या: