ठाणे : कुटुंबीयांच्या संमतीने वधू-वरांनी एकमेकांना पसंत केलं. अवघ्या काही दिवसातच लग्नाचा बार उडणार होता. मात्र चार महिने उलटल्यानंतर भावी वधूला नवरा मुलगा पसंत नसल्याने तिने होणाऱ्या नवऱ्याला चॉकलेटमधून विष देऊन ठार मारल्याची घटना भिवंडीतून समोर आली आहे.


धक्कादायक बाब म्हणजे, ही घटना मृतक अरकमच्या मोबाईलवर झालेल्या दोघांच्या संभाषणामुळे उघडकीस आली. अरकम शमसुद्दीन अंसारी (24) असं मृत्यू झालेल्या भावी वराचं नाव आहे. तर समरीन अंसारी (20) असं गुन्हा दाखल झालेल्या भावी वधूचं नाव आहे.

मृतक अरकम हा भिवंडीतील भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उस्मानीया अपार्टमेंटमध्ये कुटुंबासह राहत होता. अकरम आणि समरीन यांचे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. कुटुंबीयांच्या सहमतीने अरकमचा समरीनसोबत निकाह ठरला. येत्या सात सप्टेंबरला दोघांचं लग्न होणार होतं.

लग्न ठरल्यानंतर मोबाईलवरून दोघांमध्ये गुफ्तगू सुरु होती. अचानकपणे वधू समरीनचं अरकमवरुन मन उडालं. “तुला पाहून माझ्या मनात घृणा निर्माण होते, तू मला पसंत नाही. तू माझ्या जीवनातून निघून जा”, अशा भाषेत समरीन बोलू लागली.

तेवढ्यावरच बोलून न थांबता, ''जर माझ्यावर तुझा जीव असेल तर, मी दिलेलं विष तू खाशील का?'' असं बोलून तिने चॉकलेटला विषारी औषध लावून ते खाण्यासाठी दिलं. होणाऱ्या बायकोचं मन जिंकण्यासाठी अरकमने विषारी चॉकलेट खाल्लं आणि तो काही वेळातच बेशुद्ध पडला. ही घटना कुटुंबीयांच्या लक्षात येताच अरकमला तातडीने स्व. काशिनाथ पाटील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र चार दिवसांच्या उपचारानंतर अरकमचा मृत्यू झाला.

पोलिसांना जबाब देताना मृतक अरकमने त्यावेळी घडलेल्या घटनेची माहिती दिली नव्हती. यामुळे भोईवाडा पोलिसांनी प्रथम आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मात्र अरकमच्या कुटुंबीयांनी समरीन आणि अरकम यांचं संभाषण मोबाईलमध्ये ऐकलं असता ऑडिओ पोलिसांकडे देत कारवाईची मागणी केली.

पोलीस तपासात मृतक अरकमच्या मोबाईलवर झालेल्या दोघांच्या त्या संभाषणातूनच पोलिसांनी या घटनेचा उलगडा केला. समरीनने अरकम पसंत नसल्याने कपटी मनाने चॉकलेटला विष लावून ते खाण्यास दिल्याचं उघडकीस झालं.

दरम्यान, भोईवाडा पोलिसांनी भावी वधू समरीन हिच्याविरोधात भा.दं.वि. 306 प्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल केला असून तिला अटक करण्यात आली. सोमवारी तिला न्यायालयात हजर केलं असता 23 आगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास भोईवाडा पोलीस करत आहेत.