सातारा : सातारा नगरपालिकेने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नावाने सुरु केलेला पुरस्कार गेल्या दोन वर्षापासून बंद केला आहे. दाभोलकर यांच्या नावाने सुरू झालेला पुरस्कार बंद करण्यामागे सनातन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा हात असल्याचे समोर येत आहे. सनातन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी एका पत्रातून निर्माण केलेल्या दहशतीमुळे हा पुरस्कार बंद करण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.


नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधीत असल्याचं समोर येत आहे. याशिवाय पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचाही हत्या झाली. त्यावेळी सनातन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सातारा नगरपालिकेत येऊन डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार बंद करावा असे पत्र दिले होते.


त्यावेळी भीतीपोटी या पत्राची माहिती उघड झाली नाही आणि दहशतीमुळे दाभोळलरांच्या नावाने सुरू केलेला पुरस्कार बंद केला. मात्र आता दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना तपास लागल्यानंतर या पत्राची साताऱ्यात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.


पुरस्कार सुरू झाल्यापासून चार वर्षे या पुरस्काराला कोणताही विरोध झाला नव्हता. पहिल्या वर्षी डॉ. अभय बंग यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या वर्षी डॉ. प्रकाश आमटे, तिसऱ्या वर्षी जयंत नारळीकर, चौथ्या वर्षी रघुनाथ माशेलकर यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.