जळगाव : जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा एक हजारावर गेला आहे. आतापर्यंत 115 जणांचा मृत्यू झाल्याने जळगाव जिल्ह्यात मोठं चिंतेच वातावरण पसरले आहे. जळगाव जिल्ह्यातील कोरोनाच्या बाधितांचा मृत्यूचा आकडा पाहिला तर जळगाव जिल्ह्यातील मृत्यू दर हा देशात सर्वाधिक असल्याच मानलं जातं आहे.


गेल्या दोन महिन्यांचा विचार केला तर जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या बाधित रुग्णांच्या मृत्यूबाबत विविध कारणे सांगितले जात आहे. यामध्ये प्रामुख्याने वेळेत उपचार न मिळणे, रुग्णांमध्ये कोरोनाबाबत भीती, भीती पोटी उपचार टाळण्याकडे असलेला कल, उपचार करतांना होत असलेला हलगर्जीपणा आदी कारणे सांगितली जाते आहे. मात्र प्रशासनाच्या मते जळगाव जिल्ह्यातील मृत्यू दर हा सर्वाधिक असण्यामागील कारणांचा विचार केला तर अनेक रुग्ण उपचार घेण्यासाठी शेवटच्या टप्प्यात रुग्णालयात उशिरा दाखल झाल्याने त्यांना उपचाराचा फायदा होत नाही. मृत व्यक्तीमधील अनेक जण खूप वयस्कर होते शिवाय त्यांना विविध व्याधीही असल्याने प्रतिकार क्षमता कमी होती. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. यातील 15 जणांचा मृत्यू हा उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच झाला असल्याने हा मृत्यू दर अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.


कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आणि मृत्यू दर रोखण्यासाठी प्रशासन देखील विविध उपाय योजना या ठिकाणी राबवत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये नगरपालिका हद्दीमध्ये सर्वाधिक कोरोनाच्या रुग्णात वाढ होत असल्याने या ठिकाणच्या पाच लाख लोकांच्या सर्वेक्षणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये कोरोनाच्या संशयित रुग्णाची तपासणी करण्यात येत असून लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांना तातडीने उपचारासाठी आणि कोरोनाच्या तपासणीसाठी कोविड रुग्णालयात दाखल केले जात आहे. कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या भागात प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून त्या ठिकाणी फवरणी, आरोग्य तपासणी आणि उपचार केले जात आहे


कोरोनाचा मृत्यू दर सर्वाधिक असल्याने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्वतः जळगाव येथे जाऊन टास्क फोर्सची घोषणा केली. यामध्ये शासकीय डॉक्टरांच्या टीम सोबत जिल्ह्यातील नामवंत खासगी डॉक्टर याचा समावेश करीत असताना मुंबई मधील तज्ज्ञ डॉक्टरांचा देखील यात सहभाग करून घेण्यात आला आहे. शिवाय रुग्ण आढळेल त्या ठिकाणीच त्यावर उपचार करता यावे यासाठी स्थानिक पातळीवर खासगी रुग्णालये ही अधिग्रहित करण्यात आली आहेत.


गंभीर रुग्णांच्या उपचाराबाबत आता प्लाझ्मा थेरपीचाही शासन विचार करीत असून लवकरच अशा प्रकारचा उपचार जळगावच्या कोविड रुग्णालयात होण्याची शक्यता असल्याच जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी म्हटलं आहे. प्रतिबंधित क्षेत्रात अनेक नागरिक बेशिस्तपणे वागत असल्याने त्यांच्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सीआरपीएफची तुकडी मागवली. वाढत्या मृत्यूदराच्या बाबत आता डेथ ऑडिट कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. समितीतर्फे आतापर्यंत झालेल्या प्रत्येक मृत्यूची कारणे शोधली जाणार आहेत. जेणेकरुन पुढील काळात मृत्यू दर कमी करता येईल.


वाढत असलेल्या मृत्यू दराच्या बाबत शल्य चिकित्सक नागोजी चव्हाण यांच्या मते डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाले हे म्हणणं चुकीचं आहे. कोरोनाबाबत अद्याप ठोस उपचार पद्धती नाही. त्यामुळे चाचपडून उपचार केले जात आहेत. कोणत्याही डॉक्टरला रुग्णाचा मृत्यू व्हावा असे वाटत नाही. प्रत्येक रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. अनेक लोकांच्या मनात कोरोनाबाबत भीती असल्याने ते उपचारासाठी रुग्णालयात न येता घरच्या घरी उपचार करण्याचा प्रयत्न करतात आणि या मध्ये उशीर झाल्याने अडचण तयार होते. यासाठी कोरोनाची लागण झाल्यावर जर उपचार केले तर मृत्यू टाळता येणे सहज शक्य असल्याच मत त्यांनी व्यक्त केले आहे.


संबंधित बातम्या :