Adani : अदानी समूहाबाबत अमेरिकन रिसर्च फर्मने केलेल्या दाव्यानंतर त्याचे पडसाद भारतीय शेअर बाजार (Share Market) आणि राजकीय क्षेत्रातही उमटू लागले आहेत. अदानींची (Adani) अवस्था ‘सहारा’च्या (Sahara) सुब्रत रॉयसारखी (Subrat Roy) होईल असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. अदानींच्या व्यवहाराची चौकशी स्वतंत्र एसआयटीच्या (SIT) माध्यमातून करावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली. 


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांचे घनिष्ठ संबंध सर्व जगाला माहीत आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया, एलआयसीसह सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधील सामान्य जनतेचा पैसा मोदींनी आपल्या उद्योगपती मित्राच्या विविध कंपन्यांमध्ये कोणताही विचार न करता गुंतवला आहे. अदानी कंपनीवर केलेल्या मेहरबानीमुळे कोट्यवधी रुपये बुडण्याची भीती निर्माण झाली असून या गैरव्यवहाराची संपूर्ण चौकशी स्वतंत्र एसआयटीमार्फत करावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.


केंद्रात सत्तेवर येण्याआधीपासून उद्योपती गौतम अदानी व नरेंद्र मोदी यांचे संबंध जगजाहीर आहेत असे पटोले यांनी म्हटले. केंद्रात सत्तेत आल्यानंतर या संबंधामुळे मोदी सरकारने अदानींच्या कंपन्यांवर विशेष मर्जी दाखवत स्टेट बँक इंडियाकडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिले. देशातील सर्वात मोठी व सामान्य गुंतवणुकदारांची विमा कंपनी LIC मधील 74 हजार कोटी रुपये अदानीच्या कंपनीत गुंतवले. अदानी हे जगातील श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत दुसऱ्या नंबरवर केवळ मोदी सरकारच्या आशिर्वादामुळेच पोहचले असल्याचा आरोप पटोले यांनी केला.  फायद्यातील सरकारी कंपन्याही मोदी सरकारने अदानीच्या घशातच घातल्या असल्याचा आरोप पटोले यांनी केला.


अदानी कंपनीत मोठे गौडबंगाल आहे हे उघड होताच या कंपन्यातील शेअर कोसळले. एसबीआय, एलआयसीसह सरकारी कंपन्यांनाही मोठा आर्थिक फटका बसला असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले. अदानीचा फुगा आज फुटला आहे. सहारा कंपनीच्या सुब्रत रॉयचा सुद्धा असाच बोलबाला होता पण सहाराचा फुगा फुटला आणि सुब्रत रॉयला जेलची हवा खावी लागली. करोडो लोकांचे पैसेही बुडाले. अदानीची अवस्थाही सहाराच्या सुब्रत रॉय सारखीच होईल, असा दावा त्यांनी केला.


देशातील अत्यंत महत्वाचे आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून मुंबई विमानतळाची ओळख आहे. मुंबईचा हा विमानतळ अदानीच्या घशात घालण्यासाठी मोदी सरकारने सरकारी तपास यंत्रणांचा कसा गैरवापर केला हे सर्वांना माहित असल्याचा दावा त्यांनी केला. 


मुंबईतील वीज वितरणही अदानीला देण्याचा घाट राज्यातील फडणवीस सरकारने घेतला होता पण महावितरणचे कर्मचारी व जनतेच्या विरोधामुळे तूर्तास वीज वितरण अदानीकडे जाऊ शकले नाही. दुबईच्या कंपनीने धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी जास्त पैशांची बोली लावून करार केला असतानाही तो करार रद्द करुन मोदी सरकारच्या हट्टापायी धारावीचा प्रकल्प अदानी कंपनीला कमी पैशात देण्यात आला. अदानीचा गैरकारभार पाहता धारावीतील लाखो गरिब लोकांची घरे व छोट्या उद्योगांसमोर संकट उभे राहिले आहे. अदानीचा गैरकारभार आता उघड झाला असून सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानीकडून काढून घ्यावा, अशी मागणीदेखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.