शहरात महापालिकेकडून कचरा उचलण्याच्या प्रक्रियेत प्रचंड दिरंगाई होत असल्याने शहरात अनेक भागात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. रस्त्या रस्त्यावर साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांमुळे दुर्गंधी आणि घाण पसरत आहे. महापालिकेने नुकतेच कचरा उचलणाऱ्या जुन्या कंत्राटदाराच्या जागी ए जी एन्व्हायरो आणि बीव्हीजी अशा 2 खासगी कंपन्यांकडे शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी सोपविली आहे. मात्र, या दोन्ही कंपन्या सध्या रोज बाराशे टन कचऱ्याऐवजी फक्त पाचशे ते सहाशे टन कचराच उचलत आहे. त्यांच्याकडून कचरा उचलण्यामध्ये होणाऱ्या या दिरंगाईमुळे शहरातील विविध भागात कचऱ्याचे ढीग वाढत चालले आहे. दुसऱ्या बाजूला या मुद्द्यावर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत महापालिका आणि भाजपवर गंभीर आरोप लावले आहे.
आधीच्या कंपनीला प्रति टन साडेचौदाशे इतका टन दर दिला जात असताना कचरा संकलन होत होतं. मात्र, महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनी भाजप नेत्यांसोबत संगनमत करत नव्या कंपन्यांना जास्त दराने कंत्राट बहाल केले. मात्र, ए जी एन्व्हायरो आणि बीव्हीजी या दोन्ही कंपन्यांकडे पुरेशी यंत्रणा आणि मनुष्यबळ नसल्याने ते नागपुरात रोज बाराशे टन कचऱ्याऐवजी अर्धाच कचरा उचलत आहेत. त्यामुळे नागपूरकरांना कचऱ्याच्या दुर्गंधीत जगावे लागत आहे. आज शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी रस्त्यावरचा कचरा उचलून थेट महापालिकेत आणून फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, महापालिका प्रशासनाकडून त्यांना 24 तासात परिस्थिती सुधारण्याचा आश्वासन देण्यात आले. त्यांनतर शिवसेनेने महापालिकेत कचरा फेकण्याचं त्यांचं आंदोलन 24 तासांसाठी स्थगित केलं आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेतही भाजप विरोधात शिवसेना आक्रमक -
राज्यातील विधानसभेची निवडणूक सोबत लढलेले भाजप-शिवसेना सध्या एकमेकांच्या विरोधी भूमिकेत आहे. मुख्यमंत्री पदावरुन सुरु झालेला वाद आता स्थानिक स्वराज्य संस्थेपर्यंत येऊन पोहचला आहे. त्यामुळं संधी मिळेल तिथे शिवसेना भाजपला कोंडीत पकडण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
संबंधित बातम्या :
मुंबईकरांनो सावध व्हा! समुद्राने किनाऱ्यांवर फेकला 188 मेट्रिक टन कचरा
मुंबईकरांना कचऱ्यावर भरावा लागू शकतो अतिरिक्त कर
जीपीएसद्वारे घंटागाडीवर लक्ष, कचरामुक्तीसाठी अनोखा उपक्रम
Nagpur Garbage | कचरा विकत घेण्यासाठी महापालिकेने सुरु केली 6 दुकानं | ABP Majha