भिवंडी : ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात झपाट्याने लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे कचऱ्याची मोठी समस्या याठिकाणी निर्माण झाली आहे. याच कचऱ्याच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी कोन ग्रामपंचायतीने एक पाऊल पुढे जात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. कचऱ्याच्या गाड्यांना जीपीएस प्रणाली लावत अॅपद्वारे गाव कचरमुक्त करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
कल्याण-भिवंडी मार्गावरील कोन ग्रामपंचायत हद्दीत गेल्या 20 वर्षात नागरिकांची संख्या झपाट्यानं वाढली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे कचरा ही येथील मोठी समस्या बनली. विविध रस्त्यांवर कचऱ्यांचे ढिग दिसू लागले होते. कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी सरपंच डॉ. रुपाली अमोल कराळे यांनी कचरामुक्त गाव करण्याची संकल्पना ग्रामसभेत ठेवली.
घंटा गाडीवरील कर्मचारी कचरा उचलण्यात कामचुकारपणा करत असल्याची तक्रार यावेळी ग्रामपंचायत सदस्यांनी केली. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी गावातील तीन घंटा गाड्यावर जीपीएस प्रणाली लावून अॅप तयार करण्यात आलं आहे. दोन दिवसातच तब्बल दोन हजारहून अधिक नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये हे अॅप डाऊनलोड करून कचरामुक्त गाव उपक्रमाला हातभार लावला आहे.
अॅपचा काय फायद होतो?
या अॅपमुळे घंटा गाडीचे लोकेशन दिसते. त्यामुळे या अॅपच्या मदतीनं नागरिक आमच्याकडे घंटा गाडी आलीच नसल्याची तक्रार करु शकतात. या अॅपवर इतरही नागरी सुविधा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. यामध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध दाखल्यांचा समावेश आहे.
कोन ग्रामपंचायतीने स्वत:चे डंपिग ग्राउंडही तयार केले आहे. गावातील हजारो किलोचा कचरा त्यात टाकला जातो.