Pandharpur: यंदा राज्य सरकारर्फे आषाढी यात्रेसाठी पंढरपुरात येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे आणि त्यानंतर मोफत औषधोपचार देखील दिले जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ही अभिनव योजना आणली असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले. त्यासाठी एका महिन्यात आरोग्य विभागाची राज्यातील सर्व रिक्त पदं भरण्यात येतील, असा दावा देखील आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी केला आहे.
गेल्या वर्षी आषाढी यात्रेच्या तोंडावर राज्यात शिंदे सरकार आल्याने भाविकांसाठी खास काही करता आले नव्हते, त्यामुळे यावर्षी 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी' या मोहिमेअंतर्गत जवळपास 20 लाख वारकऱ्यांचे शहरातील 3 ठिकाणी मेगा आरोग्य कॅम्प घेतले जाणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यातून येणाऱ्या जवळपास 450 पायी दिंडी सोहळ्यात देखील आरोग्य तपासणी होणार असून पंढरपूरमधील गोपाळपूर, वाखरी आणि सोलापूर रोड या तीन ठिकाणी हे मेगा कॅम्प घेतले जाणार आहेत. आरोग्यमंत्र्यांनी या तीनही जागांची पाहणी करून तयारीच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत.
आषाढीला येणाऱ्या प्रत्येक भाविकाला आरोग्य तपासणीला आल्यावर नाश्ता देऊन त्याची तपासणी होणार आहे. या तपासणीनंतर औषधोपचार करून भाविक यात्रेत दाखल होतील. यासाठी राज्यभरातून दीड ते दोन हजार डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य सेवक येणार असून औषधांचा पुरेसा साठा ठेवण्यात येणार असल्याचेही तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी सांगितले. यंदा उन्हाळा जास्त असल्याने कोणालाही उष्माघाताचा त्रास होणार नाही, याची खबरदारी शासन घेत असल्याचे त्यांनी सांगितले. शिंदे सरकारचा हा पहिला प्रयोग असून यानंतर वर्षातील आषाढी आणि कार्तिकी या दोन्ही यात्रेत असे महाआरोग्य तपासणी कॅम्प भरवण्याची शासनाची तयारी असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
आरोग्य विभागात जवळपास 22 टक्के जागा रिक्त असून या जागा भरण्यास सुरुवात झाल्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले. यासाठी राज्य स्पर्धा परीक्षेसह इतर माध्यमातून डॉक्टरांची भरती सुरु असून शासनाने टीसीएस सोबत करार केल्याने बाकीच्या जागा देखील येत्या महिन्याभरात भरलेल्या दिसतील, असा दावा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्यासह वैद्यकीय विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर आरोग्यमंत्र्यांनी डॉ. अण्णासाहेब सोनावणे हॉस्पिटलमधील महात्मा फुले योजनेचे उदघाटन केले. याठिकाणी डेटा ऑपरेटरकडून कशा पद्धतीने नोंदी घेतल्या जातात, याची देखील त्यांनी स्वतः पाहणी केली.
हेही वाचा:
Ashadhi Wari 2023 : पालखी सोहळ्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज; आरोग्य मंत्र्यांकडून सूचनांची यादी