नाशिक : एकीकडे पावसाने ओढ दिल्यामुळे तहान भागवण्यासाठी मराठवाड्याचं लक्ष अहमदनगर-नाशिकच्या पाण्याकडे आहे. मात्र दुसरीकडे गंगापूर धरणातून दिवसभर पाण्याच्या विसर्गानंतर अचानक पाणी थांबवण्याचे आदेश जलसंपदा विभागाने दिले. जलसंपदा विभागाच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
जलसंपदा विभागाच्या या नियोजनशून्यतेमुळे 1 लाख 70 हजार टँकर पाणी वाया गेलं आहे. म्हणजेच कोट्यवधी लीटर पाण्याची नासाडी झाली. 84 लाख 95 हजार कुटुंबांना हे पाणी वापरता येऊ शकलं असतं. हे पाणी आता ना धड नाशिककरांना मिळालं, ना मराठवाड्याला.
नाशिकची भविष्यातील जलसिंचनाची तूट लक्षात घेता हा निर्णय घेतल्याचं जलसंपदा विभागानं म्हटलं आहे. लाभक्षेत्र विकास महामंडळाला लिहिलेल्या पत्रात पाणी थांबवण्याच्या आदेशानंतर पाटबंधारे विभागाने संध्याकाळी साडे सहा वाजता गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला.
समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून आज सकाळपासून जायकवाडीला पाणी सोडण्यास सुरुवात झाली होती.
गंगापूर धरणातून प्रति सेकंद 1000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. नाशकातील तीन धरणांमधून दोन दिवस पाणी सोडलं जाणार होतं. तसंच पाणीचोरी होणार नाही, अशी उपाययोजनाही करण्यात आली.
पाणी नाशिकहून जायकवाडीला पोहचायला अंदाजे अडीच दिवस लागतील. नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा दिला होता. तसंच तीनही धरणांवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
एकूण किती पाणी सोडणार?
जायकवाडी धरणामध्ये विविध धरणांमधून पाणी सोडण्यात येणार आहे. त्यानुसार मुळामधून 54 दलघमी (1.90 टीएमसी), प्रवरामधून 109 दलघमी (3.85 टीएमसी), गंगापूर धरणातून 17 दलघमी (0.60 टीएमसी), दारणा धरणातून 57.50 दलघमी (2.04 टीएमसी), पालखेड समुहातून 170 दलघमी (60 टीएमसी) असं एकूण 254 दलघमी (8.99 टीएमसी) पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले.
गंगापूर धरणातून जायकवाडीला जाणारं पाणी रोखलं, 1 लाख 70 हजार टँकर पाणी वाया
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Nov 2018 10:18 PM (IST)
कोट्यवधी लीटर पाण्याची नासाडी झाली असून 84 लाख 95 हजार कुटुंबांना हे पाणी वापरता येऊ शकलं असतं. हे पाणी आता ना धड नाशिककरांना मिळालं, ना मराठवाड्याला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -