शिर्डी : दुष्काळ निधी देण्याचा साईबाबा संस्थानांच्या निर्णया विरोधात आज शिर्डीत दंडूके मोर्चा काढण्यात आला होता यावेळी संतप्त आंदोलकांनी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांच्या गाडीची तोडफोड केली. साई संस्थान शिर्डीचा विकास करण्याऐवजी बाहेर निधी देत असल्याने आज ग्रामस्थ संतप्त झाले होते. पंधराहुन अधिक आंदोलकांना शिर्डी पोलीसांनी तोडफोड प्रकरणी ताब्यात घेतले आहे.


शिर्डीतील विविध पक्षातील लोकांनी एकत्र येत साई संस्थानच्या विश्वस्तांच्या विरोधात दंडूके मोर्चा काढला. यावेळी अध्यक्ष सुरेश हावरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत हे आंदोलक साईनिवास या इमारतीजवळ पोहचले. पोलीसांनी त्यांना विश्वस्त मंडळाच्या बैठकी पर्यंत जाण्यापासून रोखले मात्र काही आंदोलकांनी बाहेर उभी असलेली अध्यक्षांची गाडी फोडली.

हा भ्याड हल्ला असून अशा हल्ल्यांना आम्ही कधीही भीक घालणार नाही. हा हल्ला करणारे कॉंग्रेस पक्षाच्या एका गटाचे असून केवळ यांचे गोरखधंदे बंद केले म्हणून त्यांनी हा कट केल्याचा आरोप अध्यक्ष सुरेश हावरे यांनी केला.

शिर्डी पोलीसांनी दंडूके घेऊन दहशत पसरवणाऱ्या 17 आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.