अहमदनगर : कुख्यात गुंड गणेश भुतकर याची शनी शिंगणापूरमध्ये निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शनी देवाचं शनी शिंगणापूर गँगवारने हादरलंय. कुऱ्हाड आणि तलवारीने डोक्यात वार करुन सिनेस्टाईलने त्याची हत्या करण्यात आली. शनी देवाच्या पार्किंगमध्ये बुधवारी सायंकाळी सहा वाजता ही हत्या झाली.
घटनास्थळी दोन गावठी कट्टे आढळून आलेत. अविनाश बानकर, मयूर हरकल, लखन ढगे आणि अर्जुन महाले यांनी हत्या केल्याची माहिती आहे. हत्येनंतर चौघेही मारेकरी कारमधून फरार झाले, तर रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच भुतकरचा मृत्यू झाला.
भुतकर आणि मारेकरी एकमेकांचे मित्र होते, मात्र आर्थिक वादातून हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी दोन गावठी कट्टे सापडले, गोळीबार झाला की नाही, याबाबतचा तपास सुरु आहे.
भुतकर आणि मारेकऱ्यांवर अनेक गंभीर गुन्हे आहेत. भुतकर हा तडीपार असताना शनी शिंगणापूरला आला होता. त्यामुळे पोलीसांच्या कामगिरीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
या हत्येनंतर शनी शिंगणापूर आणि सोनईत नागरिकांनी त्वरित दुकानं बंद केली. पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी शनी शिंगणापूरला भेट दिली असून तणावपूर्ण शांतता आहे. तपासासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आलं आहे.
दरम्यान, भुतकरने यापूर्वी शनी शिंगणापूरच्या पोलीस निरीक्षकाला भर रस्त्यात बेदम मारहाण केली होती. तर मद्यपान करुन शनीच्या चौथऱ्यावर चढून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली होती. त्याचबरोबर संस्थाच्या तत्कालीन सीईओंना धमकावलं होतं. त्याचबरोबर गावठी कट्ट्याच्या विक्रीतही त्याचा सहभाग होता. भुतकरच्या कारनाम्याची बातमी एबीपी माझाने दाखवल्यावर त्याला तडीपार करण्यात आलं होतं.
शनी शिंगणापूर गँगवॉरने हादरलं, कुख्यात गुंडाची निर्घृण हत्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Dec 2017 11:16 PM (IST)
कुऱ्हाड आणि तलवारीने डोक्यात वार करुन सिनेस्टाईलने त्याची हत्या करण्यात आली. शनी देवाच्या पार्किंगमध्ये बुधवारी सायंकाळी सहा वाजता ही हत्या झाली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -