नवी दिल्ली : एरव्ही एखाद्या प्रकल्पाचं श्रेय लाटण्यासाठी नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु असते. पण कोकणातल्या राजापूर रिफायनरीवरुन शिवसेना आणि भाजपमध्ये एकमेकांवर प्रकल्प कोकणात आणल्याचे आरोप सुरु आहेत. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत वेगळाच वाद पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या आग्रहामुळेच हा प्रकल्प आणल्याचं सांगितलं. त्याच्या बातम्या छापून आल्यावर तातडीने शिवसेनेने त्यावर दिल्लीत प्रत्युतर दिलं.

लोकसभेतल्या शून्य प्रहराचं कामकाज संपताच, केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी असे दिशाभूल करणारं वक्तव्य करावं हे दुर्दैवी आणि गैर असल्याचं गीतेंनी म्हटलं.

शिवसेनेने लोकभावना लक्षात घेऊन या प्रकल्पाला विरोधच केल्याचं त्यांनी सांगितलं. तर हा प्रकल्प आणण्यासाठी केंद्राने कधी बैठक घेतली, आम्ही कधी उपस्थित होतो, याचा तपशील मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावा, असं आव्हान खासदार विनायक राऊत यांनी दिलं.

राजापूर रिफायनरी ही देशातली सर्वात मोठी प्रस्तावित रिफायनरी आहे. पण या रिफायनरीला राजापूरमधल्या 14 गावांचा कडाडून विरोध आहे. शिवसेनेने या गावकऱ्यांच्या बाजूने आंदोलनात उतरून त्यांना साथ दिलीय हे ही त्यांनी सांगितलं.

जैतापूर असेल, दाभोळ प्रकल्प असेल कोकणातल्या औद्योगिक प्रकल्पांवरुन याआधीही मोठं राजकारण झालेलं आहे. त्यात आता या राजापूर रिफायनरीवरुन सत्ताधाऱ्यांमध्येच आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत.