रायगड : घराचे खोदकाम करीत असताना सोन्याचे शिक्के सापडले असल्याची बतावणी करून रायगड जिल्ह्यातील मांडवा येथे राहणाऱ्या व्यक्तीला सुमारे 65 लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीसांनी या आरोपींना अटक केली असून यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे.


गेल्या महिनाभरापूर्वी अलिबाग तालुक्यातील मांडवा येथील एका इसमाची फसवणूक करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. यावेळी, दोन अनोळखी पुरुष आणि एका महिलेने मजूर असल्याची बतावणी करीत खोदकाम करताना सोन्याचे शिक्के सापडले असल्याचे सांगण्यात आले. तर, हे सोन्याचे शिक्के विकायचे असून त्यासाठी सुमारे 65 लाख रुपये देण्यात आले होते. परंतु, या सोन्याच्या शिक्क्यांची तपासणी करण्यात आली असता हातचलाखी करीत त्यांना पितळेच्या धातूची असल्याचे आढळून आल्याने त्यांनी मांडवा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. 


दरम्यान , या घटनेची गांभीर्य जाणून पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांनी स्थानीक गुन्हे अन्वेषण विभाग पोलीसांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते. याचदरम्यान, पोलीसांना मिळालेल्या माहितीनुसार सदर आरोपी हे गुजरात येथील असल्याची माहिती मिळताच पोलिसांच्या तपासाची चक्रे वेगाने फिरली आणि वळसाड, वडोदरा येथील असल्याची माहिती मिळाली होती. यावरून, आरोपींचा शोध घेतला असता तीन पुरुष आणि एक महिला यांना राजस्थान आणि ठाणे येथून अटक करण्यात आली आहे. यामध्ये गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार प्रभुताई सोलंकी, अर्जुन सोलंकी, मणीलाल राठोड आणि लक्ष्मीदेवी गुजराती यांना अटक करण्यात आली आहे. तर, या आरोपींकडून 65 लाख रुपयांची रोकड आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली गाडी जप्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर या आरोपींनी मुंबई , नाशिक, वर्धा, नागपूर , मध्यप्रदेश , गुजरात, राजस्थान या राज्यांमध्ये देखील येथे अशा पद्धतीने गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.