बुलढाणा : दुचाकी अंगावर टाकल्याच्या कारणावरुन बुलढाण्यात दोन जणांना मारहाण करुन एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरावर 10 ते 15 तरुणांच्या टोळक्याने लाठ्या-काठ्या आणि दगडाने हल्ला केला. तसंच घरासमोर उभी असलेल्या दुचाकीची तोडफोड करुन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. ही घटना 27 फेब्रुवारीच्या रात्री आठ ते नऊच्या सुमारास कैकाडी पुरा भागात घडली. या हल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून पोलिसांनी या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


शेख सरवर शेख अनवर असं पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून शेख छोटू शेख रहमान आणि मोहम्मद शफी या दोघांना टोळक्याने मारहाण केली. 
     
शेख छोटू शेख रहमान यांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रारी दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, "ते मोहम्मद शफी यांच्यासोबत 27 फेब्रुवारीच्या रात्री आठच्या सुमारास सोळंके लेआऊट इथले रहिवासी पोलीस कर्मचारी शेख सरवर शेख अनवर यांच्या घराचे बांधकाम आणि इतर काम करण्याकरता घरासमोर हजर होते. त्यावेळी त्याठिकाणी आरोपी विक्रम जाधव आणि अनिल पवार यांनी आपली मोटर सायकल अंगावर आणली. तुम्ही मोटरसायकल अंगावर का आणली? असा जाब विचारला असता, दोघांनी शिवीगाळ आणि काठीने मारहाण फिर्यादी शेख छोटू आणि मोहम्मद शफी या दोघांना मारहाण करुन जखमी केले. थोड्या वेळानंतर 10 ते 15 तरुणांच्या टोळक्याने चाल करुन पोलीस कर्मचारी शेख सरवर यांच्या घरावर हल्ला केला. घरासमोर उभी असलेली दुचाकीची काठ्या आणि दगडाने तोडफोड करुन नुकसान केले." 


या तक्रारीनंतर बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात आरोपी विक्रम जाधव, अनिल पवार यांच्यासह इतर दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. तसंच पोलिसांनी आरोपी विक्रम जाधव याला अटक केली. 


पोलीस दलात कार्यरत शेख सरवर यांच्या घरावर 10 ते 15 तरुणांच्या टोळक्याने केलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. परंतु पोलिसांनी फक्त चार जणांना आरोपी का केले? एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरावर हल्ला होतो आणि ही घटना पोलीस गांभीर्याने का घेत नाहीत? असा प्रश्न सामान्य जनतेच्या मनात उपस्थित होत आहे.