Sambhaji Bhide : वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. याआधी न्यायाधीशांवर वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांनी आता डॉक्टरांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे.  डॉक्टर हे लुटारु आहेत, ते मारायच्या लायकीचे असल्याचे त्यांनी म्हटले. 

Continues below advertisement


संभाजी भिडे हे अमरावती दौऱ्यावर आले होते. त्यावेळी शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलं. कोरोनात १०५ टक्के लोकांचा भीतीनंच मृत्यू झाल्याचा दावा संभाजी भिडेंनी केला. डॉक्टर नालायक आहेत, ते लुटारू आहे, डॉक्टर मारायच्या लायकीचे असून त्यांच्याकडे कधीही जाऊ नका, असेही संभाजी भिडे यांनी म्हटले. यावेळी त्यांनी डॉक्टरांबाबत अपशब्द वापरले. 


संभाजी भिडे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे डॉक्टरांमध्ये नाराजी असून डॉक्टरांच्या संघटना आक्रमक होण्याची शक्यता आहे. संभाजी भिडे यांनी या आधीदेखील कोरोनाबाधितांबाबत वक्तव्य केले होते. ज्यांना कोरोना होतोय, ते जगायच्या लायकीचे नसल्याचे भिडे यांनी म्हटले.


पाहा : संभाजी भिडे पुन्हा बरळले, डॉक्टरांवर केलं वादग्रस्त वक्तव्य



न्यायाधीशांविरोधात चिथावणीखोर वक्तव्य 


संभाजी भिडे यांनी या आधीदेखील वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जवळपास एक महिनाभरापासून त्यांनी न्यायाधीशांविरोधात चिथावणीखोर वक्तव्य केले होते. लिव्ह इन रिलेशनशीप अयोग नाही, असं म्हणणाऱ्या न्यायालये देखील वैध नाहीत, अशा न्यायाधीशांना त्या जागेवरून संपवले पाहिजे, असे भिडे यांनी म्हटलं होतं. 


वाईनला परवानगी देण्याच्या निर्णयावरुनही हल्लाबोल



राज्य सरकारने वाईनला परवानगी देण्याचा घेतलेला निर्णय हा संतापजनक, समाजाला हानिकारक असल्याचं संभाजी भिडे यांनी म्हटलं होतं. सरकारने वाइन सुरू करून जुगार लावलेला आहे. मला आर आर आबांची आठवण होते. आज ते असते तर हा वाईनचा निर्णय झाला नसता असेही भिडे यावेळी म्हणाले.


वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध


संभाजी भिडे यांनी यापूर्वीही अनेक वादग्रस्त वक्तव्ये केलीत. त्यांनी केलेली अनेक भाषणं वादाच्या भोवऱ्यात अडकली आहेत. संभाजी भिडे यांनी केलेल्या चिथावणीखोर भाषणानंतर भीमा-कोरेगाव दंगल पेटली असल्याचा आरोप झाला होता. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha