Weather Update : देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे किमान तापमानात घट झाली आहे. त्यामुळे तिथे थंडीचा कडाका अद्याप सुरुच आहे. दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या म्हणण्यानुसार, दिल्लीत आज ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच जोरदार वारे वाहत असल्याने थंडीचा जोर पुन्हा वाढला आहे. दिल्लीत आज कमाल तापमान 26 अंश तर किमान तापमान 13 अंश राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात देखील तापमानात चढ उतार कायम आहे. राज्यात काही भागात ढगाळ वातावरण देखील आहे. तर काही ठिकाणी तापमानाचा पारा 35 अंशाच्या पुढे गेला आहे. राज्यात आणखी तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील सांगली, सोलापूर, अकोला, परभणी या जिल्ह्यांमध्ये तापमान 35 अंशाच्या पुढे असल्याने उन्हाचा चटका वाढला आहे.
राजस्थान
राजस्थानच्या अनेक भागात पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळ वातावरण थंड झाले आहे. त्याचबरोबर सोसाट्याचा वाऱ्यामुळे थंडीही जाणवत आहे. मात्र, भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या म्हणण्यानुसार, आता हवामान स्वच्छ होईल आणि सूर्यप्रकाश पडेल. आठवडाभर असेच वातावरण राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, आजच्या तापमानाबद्दल बोलायचे झाले तर बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 28 अंश तर किमान तापमान 14 अंश राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
बिहार
आर्द्रता असलेल्या पश्चिमेकडील हवेमुळे राज्यात हवामानात बदल होताना दिसत आहे. अशा स्थितीत पुन्हा एकदा राज्यातील अनेक भागात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे, पुढील 24 तासांत ढगाळ वातावरण राहणार असून, बहुतांश जिल्ह्यांत कमाल तापमान 27 अंश, तर किमान तापमान 12 अंश राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पंजाब
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानंतर पंजाबमध्ये थंडी वाढली आहे. भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण आठवडाभर राज्यात ढगाळ वातावरण राहील. फक्त आज हवामान स्वच्छ राहण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, 2 मार्चला म्हणजे उद्या पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तापमानाबाबत बोलायचे झाले तर बहुतांश जिल्ह्यांत कमाल तापमान 24 अंश तर किमान तापमान 10 अंश राहण्याचा अंदाज आहे.
जम्मू आणि काश्मीर
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत असून, अधूनमधून पावसासोबत हिमवृष्टीही सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आजही अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हे आवर्तन 2 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. आज श्रीनगरमध्ये कमाल तापमान 8 अंश आणि किमान तापमान उणे 2 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आज जम्मूमध्ये कमाल तापमान 22 आणि किमान तापमान 10 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
उत्तराखंड
उत्तराखंडमधील बहुतांश जिल्ह्यांमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे. अनेक भागात पाऊस आणि हिमवृष्टी अपेक्षीत आहे. राज्यातील बहुतांश भागात आज किमान तापमान 3 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 13 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हिमाचल प्रदेश
काल झालेल्या हिमवृष्टी आणि पावसामुळे हिमाचल प्रदेशात किमान तापमानात घट झाली आहे. आजही वातावरण थंड राहील. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये 11 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 0 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: