Gandhi Jayanti 2022: राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची आज जयंती. महात्मा गांधी यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन अनेक जणांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला होता. आजही महात्मा गांधीचे जीवन विषयक विचार मार्गदर्शक आहेत. अहिंसा विचाराने समाज जेव्हा मार्गक्रमण करतो, त्यावेळेस आपण गांधी विचारांमुळं स्वतःला नवीन रूपात पाहात असतो. यातून मग मानवता,सर्वधर्मसमभाव सारखे विचार पुढे येत असतात. गांधीजींचे हेच विचार 70 वर्षापूर्वी ग्रामीण भारतात किती खोलवर रुजले होते याची प्रचिती देणारे गाव म्हणजे 'उजेड'.


लातूर जिल्ह्यातील एक गाव "उजेड". ज्या गावात गांधी विचारांचा उजेड, सर्वधर्मसमभावाचा उजेड, गावातील भांडण सामोपचाराने मिटवण्याचा उजेड आहे. ज्या गावात देवाची नव्हे, पिराची नव्हे. तर गांधी बाबाची यात्रा भरते.


1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाले. महात्मा गांधींच्या विचारावर विश्वास ठेवून अनेकांनी स्वातंत्र्यलढ्याच्या आंदोलनात सहभाग नोंदवला होता. त्यात सर्वांचा विजय झाला होता. मात्र मराठवाड्यावर निजामांचे वर्चस्व होते. एक वर्ष उशिराने निजाम स्टेट भारतात विलीन झालं. अशा या निजाम स्टेटमधील उजेडमध्येही महात्मा गांधीचे विचार पोहोचले होते.


अशी झाली सुरुवात 


गावामध्ये पिराची यात्रा भरवायची की महादेवाची यात्रा भरवायची यावरून वाद निर्माण होऊ लागले. गावातील काही सुजाण नागरिकांनी एकत्र आले आणि आपण गांधीबाबाची यात्रा सुरू करू असा प्रस्ताव ठेवला. गावातील सर्व समाजातील लोकांनी एकमुखाने या निर्णयाला मान्यता दिली. दिवस ठरला 26 जानेवारी. महात्मा गांधीचा पुतळा बनवून आणण्यात आला. गावच्या मुख्य चौकात तो पुतळा लावण्यात आला. रंगरंगोटी,पताका,संपूर्ण गावात रांगोळी काढण्यात आली होती. ग्रामदेवतेच्या यात्रेसारखी संपूर्ण तयारी करण्यात आली होती. गांधीबाबाच्या यात्रेमध्ये मुख्य आकर्षण असतं ते राष्ट्रगीताचं. 26 जानेवारीला सकाळी गांधी चौकातील गांधी बाबाच्या पुतळ्यासमोर सर्वजण एकत्र येतात. राष्ट्रध्वजाची मिरवणूक काढली जाते. या यात्रेत आरती ऐवजी राष्ट्रगीत गायले जाते. महात्मा गांधींना अपेक्षित असणार खेडेगाव उजेडमध्ये पाहायला मिळतो. असेच विचार संपूर्ण देशाचे झाल्यास कोठेही कोणताही धार्मिक वादच पहावयास मिळणार नाहीत.


ही यात्रा आठवडाभर चालते


त्या दिवसापासून आजतागायत  26 जानेवारीला गांधींबाबाची यात्रा या गावात भरते. 26 जानेवारीला भरणार्‍या या यात्रेत संपूर्ण उजेडकरांसोबतच लातूर जिल्ह्यातील नागरिकही सहभाग नोंदवतात. काही वर्षांपूर्वी ही यात्रा दोन दिवसाची असायची. 25 जानेवारी आणि 26 जानेवारी रोजी. यात्रेचे स्वरूप हळूहळू वाढत गेलं. आता ही यात्रा आठवडाभर चालते. 26 जानेवारीला यात्रेची सांगता होते. यात्रेच्या सुरुवातीच्या दिवसापासून पशु रोग निदान शिबिर, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर, शेवटच्या दिवशी कुस्तीचा फड, मनोरंजनाचे वेगवेगळे कार्यक्रम, गायन, वादन, नृत्य यांच्या स्पर्धा या सर्व कार्यक्रमांची आठवडाभर रेलचेल असते.


गांधी विचारांचा प्रसार आणि प्रचार


गावकरी सांगतात, महात्मा गांधी यांच्या नावे भरणाऱ्या यात्रेचा अभिमान आम्हाला आहे आणि येत्या काळात उजेड गावाला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाल्यास गावाला निधी मिळेल. त्या निधीतून इथे महात्मा गांधींचे विचार, त्यावरील ग्रंथसंपदा, अभ्यासिका इथे विकसित झाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल त्याचप्रमाणे गांधी विचारांचा प्रसार आणि प्रचार होईल. असा दृष्टिकोन समोर ठेवून गावातील अनेक तरुण मागील काही वर्षापासून शासन दरबारी प्रयत्न करत आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या


Gandhi Jayanti : राष्ट्रपती, पंतप्रधानांसह दिग्गजांकडून राजघाटावर महात्मा गांधीजींना अभिवादन


Gandhi Jayanti 2022 : महात्मा गांधीजींनी पाहिलेला ‘हा’ एकमेव हिंदी चित्रपट; ‘रामायणा’शी होता खास संबंध!