मुंबई : तुमच्या आमच्या घरातल्या बाप्पाला आज आपण निरोप देणार. पण हा निरोप देताना आपण समुद्रात, नदीत, तलावात वाढणाऱ्या जीवांचा प्राण घेण्याच्या तयारीत आहोत आणि हे दरवर्षी घडत आहे. विचार करा, प्रत्येकाचं रक्षण करणाऱ्या बाप्पाला तरी हे आवडेल का हो?


बाप्पाला निरोप देताना आपल्याला बरंच गहिवरुन येतं.. घर सुनंसुनं होतं.. पण बाप्पाच्या मूर्तींमुळे समुद्रातील, तलावातील, नद्यांमधील जीवांचं घर मात्र उध्वस्त होतं आणि त्याचं कारण आहे प्लास्टर ऑफ पॅरिस अर्थात पीओपीच्या मूर्ती शाडूच्या मूर्तीऐवजी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर वाढण्याची कारणंही तशीच आहेत. एका दिवसात शाडूच्या फक्त 2 मूर्ती बनतात तर प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या 20. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती वजनानं हलक्या असतात, शाडूच्या बऱ्यापैकी वजनदार असतात. शाडूच्या मूर्ती महाग असतात, तर प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तुलेननं स्वस्त.


मात्र प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारं नुकसान हे महाप्रचंड आहे. पीओपीच्या मूर्तींच्या विघटनासाठी 10 ते 17 वर्षांचा काळ लागू शकतो. पीओपीच्या मूर्ती रंगवण्यासाठी कृत्रिम रंगांचा भरमसाठ वापर केला जातो. ज्यात अर्सेनिक, लीड, मर्क्युरी, कॅडियम, झिंक ऑक्साईड आणि क्रोमियचा समावेश असतो.

लाल, निळा, हिरवा अशा भडक रंगांमध्ये विषारी रंगांचं प्रमाण अधिक असतं. एक थेंब मर्क्युरी 20 एकरातील तलाव विषयुक्त करतो, ज्यामुळे मासे आणि इतर जीव धोक्यात येतात. त्यामुळेच गुजरात आणि कर्नाटकाप्रमाणेच महाराष्ट्रातही प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घालण्याची मागणी जोर धरत आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, औरंगाबादसारख्या शहरांमध्ये मोठमोठ्या गणेशमूर्तींचा बडेजाव पाहायला मिळतो.


एकट्या मुंबईत 2 लाख 25 हजार मूर्तींचं विसर्जन गणेशोत्सवाच्या काळात होतं. ज्यात 30 फुटांपर्यंतच्या 250 हून अधिक मूर्तींचा समावेश असतो. यातील 80 टक्क्यांहून अधिक मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या असतात. शिवाय नारळ, फुलं, क्ले, जूट, प्लास्टिक पिशव्या आणि इतर साहित्य समुद्रात जातं ते वेगळंच.


प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घालण्याची मागणी जुनी आहे. पण प्रश्न धार्मिक आणि भावनिक असल्यानं सरकार त्याकडे गांभीर्यानं पाहात नाही. 3 वर्षाच्या दुष्काळातून उठलेल्या महाराष्ट्राला पाण्याचं विष करणं परवडणारं आहे का? याचा विचार गणेशोत्सवात सामाजिक संदेश देणाऱ्या मंडळांनी आणि रोज उठून भाषण ठोकणाऱ्या नेत्यांनीही करायला हवा इतकंच..